क्रीडा

न्यूझीलंडमध्ये बुमराहची पाठीची शस्त्रक्रिया यशस्वी

किमान 6 महिन्यांनंतर तो मैदानावर परतू शकणार

मुंबई : संघातून गेल्या बऱ्याच काळापासून बाहेर असणाऱ्या गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या दुखापचीनंतर आता त्याच्या प्रकृतीसंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे. टीम इंडियातील जसप्रीत बुमराहवर शस्त्रक्रीया करण्याच आल्याचं सांगितलं जात आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार बुमराहच्या पाठीची शस्त्रक्रीया न्यूझीलंडमध्ये पार पडली. ज्यानंतर आता किमान 6 महिन्यांनंतर तो मैदानावर परतू शकणार आहे.

सध्या त्याची प्रकृती पाहता एकदिवसीय विश्‍वचषकापूर्वी तो संघात परतेल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला मात्र मुकणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळं बुमराह 2023 पासूनच मैदानावर दिसलेला नाही. त्याच्या कारकिर्दीत आता अतिशय महत्त्वाचा टप्पा आला असून, त्याला मुकणं बुमराहच्या कारकीर्दीला काहीसं प्रभावितही करु शकतं.

पण, 2023 च्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येच ही स्पर्धा असल्यामुळं बुमराह जवळपास या स्पर्धेत सहभागी होणार नाही असंच चित्र दिसत आहे. अधिकृत माहितीनुसार बुमराहला शस्त्रक्रियेतून सावरण्यासाठी 4 आठवड्यांचा कालावधी लागेल पण, याहूनही जास्त कालावधी लागू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर साधारण 5 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तो मैदानावर परतू शकतो.

न्यूझीलंडमध्ये बुमराहनं त्याच डॉक्टरांकडून सर्जरी करून घेतली आहे, जिथं इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यानंही उपचार घेतले होते. जसप्रीत बुमराहची आंतरराष्ट्रीय कारकिर्द आकडेवारीनुसार 29 वर्षीय बुमराहनं आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या वतीनं 30 कसोटी सामने, 72 एकदिवसीय सामने आणि 60 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं क्रमश: 128, 121 आणि 70 गडी बाद केले आहेत. आयपीएलच्या कारकिर्दीमध्येही त्यानं 120 सामन्यांत 7.39 च्या इकॉनमीनं गोलंदाजी करत 145 गडी बाद केले आहेत.