Neema-Arora Akola
अकोला

नैसर्गिक आपत्तीचे गांभिर्य ओळखून वेळेत पंचनामे पूर्ण करा – अकोला जिल्हाधिकारी

अकोला, २० मार्च – जिल्ह्यात नुकत्याच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी क्षेत्रीय यंत्रणेला दिले आहेत. संपकाळात नैसर्गिक आपत्ती ध्यानात घेऊन कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर संयुक्त पंचनामे पूर्ण करावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात गेल्या दि.६ पासून वेगवेगळ्या दिवशी विविध क्षेत्रात अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसत आहे. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात बार्शी टाकळी, पातूर, तेल्हारा या तीन तालुक्यात या आपत्तीची झळ बसली आहे. त्यात बार्शी टाकळी तालुक्यातील १०, पातूर तालुक्यातील २३ तर तेल्हारा तालुक्यातील १७ अशा एकूण ५० गावांमध्ये नुकसान झाले आहे. तीनही तालुके मिळून ३७२१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक पंचनाम्यात दिसून आले आहे. एकूण ३४७६.१७ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. आतापर्यंत १९ गावांचे पंचनामे पुर्ण असून १२३७ शेतकऱ्यांचे ७९७.१७ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

दरम्यान, नुकसानग्रस्त भागात महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने संयुक्त पंचनामे पुर्ण करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज सकाळी आढावा बैठक घेतली. नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग लक्षात घेऊन क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी आपले पंचनाम्याचे काम वेळेत पुर्ण करावे व यंत्रणांनी अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.