ramdas-athawale-nashik-road
ताज्या बातम्या महाराष्ट्र

निवडणूक आयोगाचा निर्णय राज्यघटनेनुसारच : रामदास आठवले 

देवळाली कॅम्प : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानानुसार व मार्गदर्शक तत्त्वानुसारच निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे.

लोकशाहीत बहुमताला किंमत असते, याचे भान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ठेवायला हवे होते, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले.

नव्यानेच झालेल्या लॅमरोड परिसरातील कलापूर्णम्‌‍ तीर्थस्थानाला भेट देण्यासाठी ना. आठवले हे देवळाली कॅम्पला आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. केंद्रात, राज्यात भाजप व शिवसेनेबरोबर युती आहे. आगामी लोकसभा, विधानसभासह स्थानिक पातळीवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका यादेखील महायुतीच्याच माध्यमातून लढवण्याचा निर्णय असून, जर आमच्या पक्षाला सकारात्मक जागा न दिल्यास आम्ही स्वबळावर लढू, असे ते म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाची वाटचाल अतिशय गतिमान असल्याने जागतिक पातळीवर त्याची नोंद घेतली जात आहे. काँग्रेसने 70 वर्षांत केले नाही ते भाजपने 9 वर्षांत करून दाखवले.

मात्र, त्यामुळे संविधान खतरे में है हा काँग्रेस व विरोधकांचा प्रचार खोटा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कसबापेठ व चिंचवड या पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना व रिपाइं युतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.

नाशिक मनपातील समाजमंदिर यांचे भाडे यबाबत लक्ष घालू, देवळाली रेल्वे स्टेशनवर पूर्वी थांबणाऱ्या सर्व गाड्यांना पुन्हा थांबा देणे, भगूर येथील स्वा. सावरकर स्मारकाप्रमाणे देवळालीतील जैन समाजाचे कलापूर्णम्‌‍ तीर्थ व शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ज्ञानमंदिर यांचा समावेश जिल्हा पर्यटन मंडळाच्या यादीत करण्याबाबत राज्य शासनाला सूचना करणे असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी पत्रकार परिषदेविषयी सविस्तर माहिती विशद केली. प्रदेश पदाधिकारी संतोष कटारे यांनी आभार व्यक्त केले. पत्रकार परिषदेला प्रदेश नेते विश्वनाथ काळे, भाऊसाहेब धिवरे, युवा जिल्हाध्यक्ष अमोल पगारेंसह सिद्धार्थ पगारे, आर. डी. जाधव, चंद्रकांत भालेराव, सुनील लक्ष्मण कांबळे, प्रमोद बागूल, रामबाबा पठारे, महेश सुकेणकर, सनी साळवे, सुभाष बोराडे, सुरेश निकम, पंडित साळवे, गौतम भालेराव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराचे नाव बदलल्याने विकास नाही होत

एखाद्या शहराचे नाव बदलल्याने शहराचा विकास होत नसल्याचे यावेळी रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. काल केंद्र सरकारने औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्यास मंजुरी दिली. गेल्या अनेक दिवसांची मागणी मान्य झाल्याने एकीकडे जल्लोष केला जात असताना आठवलेंच्या या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत.