अकोला

नाट्यलेखिका प्रा.दीपाली सोसे यांची स्व.वेणूताई बिडकर फाऊंडेशनच्या विदर्भस्तरीय स्त्री-रत्न पुरस्कार-२३साठी निवड

अकोला: येथील सुप्रसिध्द कथा व नाट्यलेखिका, गीतकार, संपादिका, समुपदेशिका, निवेदिका, व्याख्यात्या, प्रकाशिका व शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुपरिचित असलेल्या व आनंदी गुरुकुल ?क्टिंग अकॅडमीच्या संस्थापिका असलेल्या प्रा.दीपाली आतिश सोसे यांची मातोश्री स्व.वेणूताई बिडकर फाऊंडेशन,कुंभारी, अकोला यांच्या वतीने दिल्या जाणार्‍या या वर्षीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘विदर्भस्तरीय स्त्री-रत्न पुरस्कार-२३’ करिता त्यांच्या नाट्य व चित्रपट विषयक क्षेत्रातील लेखन व कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ अभिनेते, माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकारामभाऊ बिरकड यांनी दिली.

यावर्षी नाट्य व चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करण्यासासाठी सन्मानपूर्वक दिल्या जाणारा हा पुरस्कार दीपाली सोसे यांना दि.५ मार्च २०२३ रोजी अकोला येथील प्रमिलाताई ओक सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या शुभहस्ते व माजी आमदार गजाननराव दाळू गुरुजी,ज्येष्ठ अभिनेते तुकारामभाऊ बिडकर,हिंदी चित्रपट ‘दुष्यंत’फेम अभिनेते कमलेश सावंत,जि.प.अध्यक्षा संगीताताई अढाऊ,आमदार किरण सरनाईक,आमदार अमोल मिटकरी,आमदार वसंत खंडेलवाल,आमदार धीरज लिंगाडे,माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे या मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य समारंभात स्मृतिचिन्ह,मानपत्र,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात येणार आहे.

आजवर त्यांची नाटकांसहित विविध विषयांवरील ६५ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या वीसहून अधिक गीत, कवितांच्या ध्वनीफित तसेच स्वच्छ भारत,लस घ्या लस,शाळा एके शाळा,शेतकर्‍याचा मुलगा,मला नोरा पाहिजे,मतदार राजा जागा हो अशा अनेक लघुपटांच्या चित्रफितीही प्रसिध्द झाल्या आहेत.त्यांना बी.एड., सीईटी परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून ९ व्या क्रमांकाने आणि ‘नाट्यशास्त्र पदविका’ परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून १ ल्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत झळकण्याचा बहुमान लाभला आहे. मुंबई दूरदर्शनच्या सह्यांद्री वाहिनीवरील ‘रेशीमगाठी’ या कार्यक्रमात ‘उपांत्य फेरी’ विजेतेपदही त्यांनी मिळविले आहे.

आनंदी गुरुकुल अभिनय अकॅडमीच्या माध्यमातून विदर्भातील विद्यार्थी कलाकारांना त्यांनी हिंदी,मराठी,तमीळ,तेलुगु भाषेतील चित्रपटांसहित मराठी, हिंदी मालिकांमधून, लघुपट, रंगभूमी, जाहिराती अशा विविध माध्यमांतून ज्या संधी व सन्मान मिळवून देण्यासाठी ‘अभिनय गुरु’ म्हणून अध्यापकाची व मार्गदर्शकाची जी भूमिका अत्यंत समर्थपणे पार पाडली आहे तसेच त्यांनी लिहिलेल्या व संगीतकार अनिल मोहिले यांचे संगीत लाभलेल्या ‘रंग दे बसंती’या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगातून मिळणारे मानधन व त्या नाटकाला मिळालेली पुरस्काराची रक्कमही कर्करोगग्रस्त मुलांच्या उपचारासाठी खर्च करण्याचे त्यांनी दिग्दर्शक प्रशांत वाघ यांना लिहून दिले होते.

त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांचे व नाट्यछटांचे प्रयोग तथा सादरिकरण महाराष्ट्र व इतरही राज्यात झाले आहे.त्यांच्या शुभहस्ते उत्तरप्रदेश राज्यातील कोंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे उद्घाटनही झाले होते,त्यांच्या ‘शहिद भगतसिंह’ या पुस्तकाची महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील ग्रंथालयांसाठीही निवड केली आहे.याशिवायही विपुल लेखन व भरीव कार्य त्यांनी या क्षेत्रात केले असल्यानेच त्यांची या पुरस्कारासाठी सन्मानपूर्वक निवड करण्यात आल्याचे आयोजन समितीकडून कळविण्यात आले आहे.