लासुर, 19फेब्रुवारी: औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत विचित्र अपघात झाला आहे. लासुर स्टेशन येथे नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या एका दुकानात भरधाव कार घुसल्याने एका दुकानदाराचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या दुकानदाराचं नाव रोहित किशन पवार असं आहे. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वसू सायगाव येथे हा अपघात घडला.
गंगापूर तालुक्यातील वसू सायगाव येथे नागपूर-मुंबई महामार्गावर किशन पवार यांचे फरसाणाचे दुकान आहे. शनिवारी किशन पवार यांचा मुलगा रोहित पवार हा दुकानात बसला होता. यावेळी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक भरधाव कार थेट त्यांच्या दुकानात घुसली.
यामध्ये कारच्या धडकेत दुकानाबाहेर असलेल्या चार दुचाकींचा चुराडा झाला.भरधाव कार पवार यांच्या दुकानात घुसल्याने आतमध्ये बसलेला रोहित पवार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने औरंगाबाद येथे हलविण्यात आले.
मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.या घटनेची माहिती मिळताचं परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली. नागरिकांनी याबाबात पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलीस कर्मचारी हनुमंत सातपुते, विनोद पवार, अक्षय साळुंके, बाबा शेख पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले. रोगितच्या मृत्यूमुळे पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.