Enforcement-Department
क्राईम

नागपूर : ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या कार्यालयावर ‘ईडी’ची धाड

माजी बिशप पी.सी.सिंह फसवणूक प्रकरणी चौकशी

नागपूर : माजी बिशप पी.सी. सिंह याच्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या (सीएनआय) विविध कार्यालयांवर ‘ईडी’कडून आज, बुधवारी छापेमारी करण्यात आली. ‘ईडी’च्या पथकाने ‘सीएनआय’च्या नागपूर कार्यालयावरदेखील धाड टाकली. यावेळी 2 तास चाललेल्या शोध मोहिमेत विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली.

वादग्रस्त बिशप पी.सी.सिंह याने ‘सीएनआय’अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये अनेक गैरप्रकार केले. याशिवाय संस्थेच्या जमिनी व इतर आर्थिक बाबींमध्येदेखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मध्य प्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पी.सी.सिंहला नागपूर विमानतळावरून अटक केली होती. ‘ईडी’नेदेखील फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ‘ईडी’ने बुधवारी देशभरातील 11 जागांवर छापे मारले. यात नागपुरातील कार्यालयाचा देखील समावेश होता. ‘सीएनआय’च्या सदर भागातील कार्यालयाची यावेळी झडती घेण्यात आली. यावेळी तेथील विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली व बरीच महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. ‘ईडी’चे पथक सुमारे दोन तास कार्यालयात होते. या कारवाईमुळे ‘सीएनआय’च्या नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.