मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची आज विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे जावून सदिच्छा भेट घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल परब, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अनिल पाटील, कपिल पाटील, विनोद निकोले आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने पहिल्यांदाच राज्यपालांची भेट घेतली.