अकोला

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सभा सुरक्षा समिती प्रमुखपदी सतिश वानखडे यांची निवड

अकोला : भारतात धम्मचक्र प्रवर्तन दिन हा नागपूर नंतर अकोला जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या जाहिर सभेची भव्यता पाहता या सभेच्या सुरक्षेसाठी श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे गुरूजी यांनी १०० सदस्य असलेल्या “सभा सुरक्षा समितीच्या” प्रमुखपदी सतिश वानखडे यांची निवड केली.

भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्ताने आयोजित भव्य धम्म मेळावा व जाहिर सभेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन ऐकायला देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी व फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारे लाखो विचारवंत उपस्थित असतात.

कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत दोन वर्षे या जाहिर उत्सवांवर प्रचंड मर्यादा होत्या. मात्र यंदा सर्व निर्बंध उठवल्यामुळे ह्या वर्षी दि. ६ ऑक्टोबर २०२२ रोजी स्थानिक अकोला क्रिकेट क्लब मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव निमित्ताने जाहिर सभा हि भव्यदिव्य होणार आहे.

या भव्य जाहिर सभेच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच अकोला जिल्ह्यातील १०० पदाधिकाऱ्यांची “सभा सुरक्षा समितीत” निवड करण्यात आली आहे व या सभेच्या सुरक्षा समितीच्या प्रमुख पदाची जवाबदारी हि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सतिश वानखडे यांच्या खांद्यावर देण्यात आली. सतिश वानखडे यांच्या निवडीमुळे जिल्हाभरातील युवा वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन त्यांच सर्वत्र अभिनंदन होत आहे.