Propert-sealed
अकोला

थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने मालमत्तेला केले सील

अकोला: थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने महापालिका मालमत्ता करविभागाने महापालिकेच्या उत्तर झोनमध्ये एका मालमत्तेला सील लावण्यात आले. दरम्यान थकीत कराचा भरणा नागरिकांनी करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महापालिकेसमोर आर्थिक वर्ष संपुष्टात येत असताना महापालिकेला कोट्यवधी रुपयाच्या कर वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे महापालिकेने थकीत तसेच चालु आर्थिक वर्षातील मालमत्ता करवसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे.यासाठीच थकीत कराचा भरणा न करणार्‍या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. उत्तर क्षेत्रातील सिटी कोतवाली जवळ, गांधी रोड येथील वार्ड क्रं. सी१ मालमत्ता क्रं. ७४२ धारक सुरेश व संतोष गणपतलाल अग्रवाल यांचे कडे सन २०१७- १८ ते सन २०२२-२३ पर्यंतचा १ लाख ८१ हजार ९८१ रुपये मालमत्ता कर थकीत होता.

थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत वारंवार सुचनाकरुनही थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने अखेर त्यांच्या मालमत्तेला सिल लावण्यात आले.ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये आणि कर अधिक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, सहा.कर अधीक्षक हेमंत शेळवणे, दिलावार खां युसुफ खां दर्रानी, अविनाश वासनिक, नारायण साखरे, चंदु मुळे, सुरक्षा रक्षक कल्पना उपरवट आदीनी केली.

थकीत मालमत्ता करावर दरमहा दोन टक्के यानुसार व्याज आकारले जाते. त्यामुळे ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत आहे. त्या नागरिकांनी आपल्या थकीत कराचा भरणा करुन जप्तीची अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.