क्राईम

डोंबिवलीत भाजी विक्रेत्या महिलेवर चाकूने वार

डोंबिवली : ४० वर्षापेक्षा जास्त काळ भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेवर एकाने जुन्या वादावरून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडवर घडली.

या प्रकरणी हल्लेखोराविरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भावेश सुभाष मल्ला असे चाकूने वार करणाऱ्या हल्लेखोराचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील गोळवली परिसरात राहणाऱ्या रुक्मिणी कमलाकर पाटील या अनेक वर्षापासून फडके रोडवरील राजहंस ज्वेलर्ससमोरील रस्त्याच्या कडेला भाजी विकतात.

बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या जागेच्या समोर भावेश हा उभा राहिला असता त्याला पाटील यांनी त्याला बाजूला होण्यास सांगितले.

याचा राग आल्याने भावेशने पाटील यांना शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. संतापलेल्या भावेशने त्याच्याजवळील चाकूने पाटील यांच्या कानाच्या बाजूला वार केला.

या हल्ल्यात पाटील या जखमी झाल्या. पाटील यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात भावेश विरोधात गुन्हा दाखल केला आहे.