KDMC-Waste
महाराष्ट्र

डोंबिवलीत ओला दुर्गंधीमिश्रित कचऱ्याने नागरिक हैराण

डोंबिवली, २१ फेब्रुवारी : पालिका हद्दीतील नागरिकांनी ओला-सुका कचरा यांचे वर्गीकरण करूनच तो द्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले होते.

मात्र सर्वसाधारणपणे असे होत असल्याचे दिसून येत नाही. परिणामी कचरा गाडी (आर सी) व घंटा गाडी यामध्ये सर्व कचरा भरण्यात येतो. मुळात काही गाड्या गळक्या असल्याने रस्त्यावरून जाताना ऑईलमिश्रित कचऱ्यातील घाण पाणी रस्त्यावर पडते.

यामुळे त्याचा त्रास दुचाकी वाहनांना होत असून सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार अशी विचारणा होत आहे.

दररोज सफाई कर्मचारी साफसफाई करीत असतात. आरोग्य विभागाच्या माध्यमातून कचरा विषयी तक्रारी आणि सूचनांची देखभाल केली जाते.

पूर्वी डोंबिवली शहरातील कचरा विषयी जागरूकता होती. तत्कालीन उपायुक्त रामदास कोकरे यांनी “स्वच्छ सुंदर शहर” या उक्तीनुसार विविध योजनांच्या माध्यमातून शहरातील कचरा समस्येवर मार्ग काढून शहर साफसूफ ठेवण्यात सफलता मिळवली होती. आता मात्र पुन्हा कचऱ्याविषयी मोठ्या तक्रारी येत असल्याचे दिसून येत आहे.

कचरा गाडी (आर सी) मधील गळतीमुळे रस्त्यावर पसरणाऱ्या ऑइलमिश्रित पाण्यामुळे दुचाकी चालकांचे अपघात झाल्याच्या नोंदी आहेत. अशा प्रकारामुळे वृद्ध जोडप्याचा झालेला अपघात शहरात चर्चेचा विषय होता. या अपघातानंतर कचरा गाडी (आर सी) ची देखभाल दुरुस्ती विषस समोर आला होता.

मात्र आता तो विषय पूर्णपणे मागे पडला असून गळक्या कचरा गाडीतून (आर सी) कचरा वाहतूक होत आहे. एमआयडीसी निवासी विभागातील मिलापनगर मधील जुन्या गणेश विसर्जन तलावासमोर रोज सकाळी छोट्या घंटागाडीतील सर्व ओला कचरा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मोठ्या कचरागाडीमध्ये शिफ्ट करण्याचे काम केले जाते.

हे करताना काही कचरा खाली पडून तसाच राहून जातो व दुर्गंधीयुक्त पाणीसुध्दा खाली सांडते आहे ज्यामुळे आसपासच्या परिसरात घाण वास तर पसरतोच व मच्छरांचा प्रादुर्भावही वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो असल्याची तक्रार येत आहे.

आधीच निवासी भागात रासायनिक प्रदूषण, रस्त्यांवरील धूळ यामुळे लोक कंटाळले असून आता त्यांना कचऱ्यापासून होणाऱ्या प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासनाने आता तरी जागे होऊन यावर त्वरित मार्ग काढावा, असे नागरिकांना वाटत आहे.