२१ फेब्रुवारी, अकोला: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपले संबंध बाबासाहेबांचा नातू म्हणून आहेत. त्यामुळेच त्यांच्याशी भेटी आणि चर्चा झाल्या आहेत. इंदू मिलच्या स्मारकाबाबत आम्ही भेटलो आहोत. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती झाली.
या वेळी आपले संबंध राजकीय होते. अशा दोन भूमिकेत आपण असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.दोन वर्षे महानगरपालिकेच्या निवडणुका का घेतल्या नाहीत. म्हणून मुंबईचे रोहन पवार हे २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का करू नये, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहेत, अशी माहिती अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
त्यानंतर लगेच महापालिकेच्या निवडणुकाही जाहीर होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.२०१४ पर्यंतच्या राज्यातील सर्व निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत लढणार असल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे मनोमिलन कायम राहिल्यास आम्ही मात्र एकटे लढण्यास मोकळे आहोत, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
ते अकोल्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.अॅड. आंबेडकर म्हणाले की, आमची ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत नाही. मात्र, युतीच्या घोषणेपूर्वी ठाकरे यांनी आपण महाविकास आघाडीसोबत आहोत, तुम्ही सुद्धा सोबत यायला हवे, असे म्हटले होते. त्यावर आम्ही हो म्हटलो; मात्र त्यानंतरही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून प्रस्ताव किंवा अनुकूलता नाही.
आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही. २०२४ पर्यंतच्या सर्व निवडणुका आम्ही ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत लढणार आहोत, असे सांगताना विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यावर त्यांनी बोलणे टाळले.
तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जिव्हाळा काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत राहिल्यास आपण त्यांच्या सोबत राहणार नसून स्वबळावर लढू, असेही आंबेडकर म्हणाले. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जि.प. अध्यक्षा संगीता अढावू, महासचिव मिलिंद इंगळे, प्रदीप वानखडे उपस्थित होते.