Tilak-Rashtriya-Shala-Akola
अकोला

टिळक राष्ट्रीय शाळा परिसरात स्वच्छता अभियान संपन्न

अकोला: सामाजिक सेवेत सदा कार्यरत असणार्‍या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने १ मार्च दिनी राज्यात सर्व दूर महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अनुषंगाने स्थानीय मोठ्या उमरी परिसरातील टिळक राष्ट्रीय शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे राज्यपाल नियुक्त स्वच्छता दूत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली.

प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षापासून व्यापक स्वरूपात स्वच्छता अभियान राबवित असून प्रतिष्ठानच्या दिनांक १६ नोव्हेंबर २०१४ च्या व्यापक स्वच्छता अभियानाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. सामाजिक सेवेसाठी डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारत सरकारने सन २०१७ साली पद्मश्री किताब बहाल केला आहे.

टिळक राष्ट्रीय शाळेत संपन्न झालेल्या या स्वच्छता अभियानात तब्बल दोनशे सदस्यांनी सहभाग घेत परिसरातील टन कचरा संकलित केला.