राजकीय

जॉर्ज सोरोस भारतात ढवळाढवळ करताहेत- स्मृती ईराणी

जनतेला केले देशहिताच्या रक्षणाचे आवाहन

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : सातत्याने भारताच्या विरोधात गरळ ओकणारे अमेरिकन उद्योजग जॉर्ज सोरोस यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जॉर्ज सोरोस यांनी भारताच्या लोकशाहीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला असून पंतप्रधान मोदी हे त्यांचे लक्ष्य असल्याचे स्मृति ईराणी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

जर्मनीच्या म्युनिक सुरक्षा संमेलनात अमेरिकन उद्योजक जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान मोदींवर भांडवलशाहीच्या समर्थनाचा आरोप केलाय. तसेच उद्योपती गौतम अदानी आणि पंतप्रधानांचे मधुर संबंध असल्याचे म्हंटले आहे.

तसेच भारतीय सरकार उलथून टाकण्यासाठी त्यांनी 100 अब्ज डॉलर्सची घोषणा केलीय. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी सोरोस यांच्या बेताल विधानांचा चांगलाच समाचार घेतला. यासंदर्भात स्मृती ईराणी म्हणाल्या की, जॉर्ज सोरोस भारतीय लोकशाही व्यवस्थेत ढवळाढवळ करताहेत. सोरोस यांना भारतात त्यांच्या हिताचा विचार करणारे कळसुत्री व्यवस्था चालवणारे सरकार हवे आहे.

त्यासाठी सोरोस भारतीय लोकशाही व्यवस्थेला आव्हान देत आहेत. इथल्या लोकशाही मूल्यांवर आघात करण्याची उघड भाषा वापरत आहेत. विशेष म्हणजे सोरोस यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी लोकनियुक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असे ईराणी यांनी सांगितले.

भारतातील सरकार हे लोकांनी निवडलेले असून आमचे सरकार संविधानानुसार जनतेसाठी काम करते. त्यामुळे देशाच्या विरोधातील कुठलेही षडयंत्र आम्ही सहन करणार नाही. आम्ही यापूर्वी देखील परदेशी शक्तींचा पराभव केलाय असा इशारा ईराणींनी दिली.

जॉर्ज सोरेस यांनी पंतप्रधान मोदींसारख्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी एक अब्ज डॉलर्सच्या फंडांची घोषणा केलीय. हा प्रकार म्हणजे भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर आघात आहे. लोकशाही पद्धतीने निवडलेले सरकार ध्वस्त करण्याचा प्रयत्न असल्याचे स्मृती ईराणी म्हणाल्या. तसेच जॉर्ज सोरेस सारख्या भारताचे अहित करू इच्छीणाऱ्या परदेशी शक्तींना भारतीय जनतेने धडा शिकवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.