गुलाब, शेवंती, डेझी आणि जिप्सोफीला फुलांपासून तयार करण्यात आली ८ फूट उंचीची आकर्षक प्रतिकृती
मुंबई: ८ मार्च हा जगभरात महिला दिन साजरा केला जातो. याच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने महानगरपालिका मुख्यालया समोरील ‘सेल्फी पॉईंट’वर अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. यामध्ये गुलाब, शेवंती, डेझी आणि जिप्सोफीला या फुलांचा वापर करून हृदयाची आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
महिलांप्रती हृदयापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तयार केलेली ही प्रतिकृती महिला दिनाच्या निमित्ताने दिवसभर व संध्याकाळी उशिरापर्यंत ‘सेल्फी पॉईंट’वर असणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना परदेशी यांनी सांगितले आहे की, ही प्रतिकृती तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली बहुतांश फुले ही महापालिका उद्यानांमधील आहेत. तसेच तयार करण्यात आलेली प्रतिकृती ही तब्बल ८ फूट उंचीची आणि ५ फूट लांबीची आहे. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी सुमारे ५०० पेक्षा अधिक गुलाब आणि तेवढ्याच संख्येतील शेवंतीच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. तर डेझी आणि जिप्सोफिला या फुलांचे प्रत्येकी १० गुच्छ यासाठी वापरण्यात आले आहेत.
गुलाब
गुलाबाचे फुल हे जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. संपूर्ण जगभरात गुलाबाच्या एक हजाराहून अधिक प्रजाती असून त्यांची दरवर्षी लागवड केली जाते. ‘सेल्फी पॉईंट’ करता वापरण्यात आलेली फुले ही गुलाबी रंगाची असून गुलाबी रंगाचे गुलाब हे कृतज्ञता व प्रशंसेचे प्रतीक मानले जाते.
शेवंती
शेवंतीचे फुले ही निष्ठा, आशावाद व आनंदाचे प्रतीक मानली जातात. ही फुले पूजेकरिता व मंदिरात मोठ्या प्रमाणात वापरली जात असल्याने या शेवंतीच्या फुलांना धार्मिक महत्त्वही आहे. त्याचबरोबर शेवंतीची फुले ही फुलांच्या माळा, हार, गजरे, वेणी बनविण्यासाठीही वापरण्यात येतात.