जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव येथे भरवस्ती असलेल्या शांतीनगर येथे मध्यरात्री दोन मोटारसायकल वरील चार अज्ञात इसमांनी एका व्यापार्याचा पाठलाग करून, रस्त्यात त्याची ऍक्टीवा गाडी आडवुन, हातबुक्याने मारहाण करून, ऍक्टीवा गाडीच्या पायदानावर ठेवलेली २ लाख ६५ हजार रुपये असलेली लाल रंगाची बॅग जबरीने हिस्कावुन पालयन केले. व्यापार्याला लुटल्यामुळे चाळीसगावात व्यापारी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय हशमतराम मंदानी वय ४४ वर्षे धंदा-मेडीकल रा. प्लट नं. ३१. शांती नगर, पवारवाडी. यांचे घाटरोड येथे गणेश सेल्स कार्पोरेशन नावाचे होलसेल मेडीकल स्टोअर्स आहे. काल दि, १५ रोजी रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास संजय मंदानी हे त्यांच्या ऍक्टीवा गाडी घेवून (क्रमांक एम.एच.१९ डी.एल.७२५४ ) घाटरोडवरील मेडीकल वरुन त्याच्या सोबत दुकानाचे ८ ते १० दिवसाचे माल विक्री व उधारीचे जमा झालेले पैसे अंदाजे २ लाख ६५ हजार रुपये रोख सोबत असलेल्या लाल रंगाच्या स्कुल बॅगमध्ये ठेवुन शांतीनगर येथे घरी जाण्यासाठी निघाले.
बँग ही ऍक्टीवा गाडीच्या पायदानावर ठेवलेली होती. ते घरी जातांना रस्त्यामध्ये स्टेशन रोडवरील सावन ड्रायफ्रुट येथे काही सामान घेण्यासाठी थांबले होते. तेव्हा पैशांची बँग त्यांच्या हातातच होती. सामान घेतल्यानंतर पैशांची बैंग पुन्हा ऍक्टीवा गाडीच्या पायदान वर ठेवुन, ते व मित्र मोहीत विशनदास पवानी यांच्या रेल्वे स्टेशन जवळील माल धक्याकडे जाणार्या रोडवरील फेबीओ मेन्स वेअर या दुकानावर गेले. तेथे ५-१० मिनीट थांबुन पैशांची बॅग मित्र मोहीत पवानी याच्याकडे ठेवुन, ते मित्र विशाल कारडा यांची आजी मयत झाल्यामुळे नवजवान सिंधी सेवामंडळ या ठिकाणी दारावर बसण्यासाठी गेले होते.
त्याठिकाणी ५-१० मिनीट थांबल्यानंतर ते पुन्हा मित्राच्या फेबीओ मेन्स वेअर या दुकानावर आले व तेथुन पैशांची बँग घेवुन अँक्टीवा गाडीने पवारवाडी मार्गे घरी जाण्यासाठी निघाले असता, घरी पोहचण्या आधीच सुमारे ०९.२५ वाजता त्यांच्या घराजवळ असलेल्या गुरुमुख तलरेजा यांच्या घरासमोर त्याच्या मागुन दोन मोटारसायकवर चार मुले आले आणि त्यांच्यातील एक मोटारसायकल स्कुटीला आडवी लावली व दुसर्या मोटारसायकल वरील दोन मुलांनी खाली उतरुन, त्यापैकी एकाने संजय यांना हातबुक्याने तोंडावर पाठीवर मारहाण करुन किरकोळ दुखापत केली व दुसर्याने अँक्टीवा गाडीच्या पायदानावर ठेवलेली पैशांची बॅग जबरीने हिस्कावुन ते चौघे त्यांच्या मोटारसायकलवरुन पळुन गेले.
संजय मंदानी यांनी आरडा-ओरड केल्याने कॉलनीतील लोक जमा झाले. त्यानंतर याबाबत पोलीसांना फोन केल्याने पोलीस तात्काळ त्याठिकाणी पोहचलेे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला, परंतू ते मिळुन आले नाही. अज्ञात इसमांचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे, मध्यम उंचीचे, त्यापैकी दोघांनी काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते व तिसर्याने ग्रे रंगाचे आणि चौथ्याने ग्रे/लाल रंगाचे जॅकेट घातलेले होते. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला संजय हशमतराम मंदानी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.