अकोला

छत्रपतींचे विचार आत्मसात करा – हभप गजानन महाराज रोड

हातरुण: महाराष्ट्रात ज्यांचे नाव घेतल्यावर अंगावर काटा येतो, जो अभिमान वाटतो ते राजे शिवछत्रपती हे न्यायप्रिय असण्यासोबत गोरगरीब, माताभगिनींना आश्रय देणारे राजे होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करताना छत्रपतींचे विचार आत्मसात करा. छत्रपती हे डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही तर डोक्यात घालण्याचा विषय आहे, असे प्रतिपादन हभप गजानन महाराज रोडे (कापूसतळणी) यांनी केले.

ते बोरगाव वैराळे येथे श्री जागेश्वर मंदिरात संत गजानन महाराज प्रगटदिन ते महाशिवरात्री व शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की, आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे ती अतिशय उत्साहाने साजरी करा, परंतु जयंती साजरी करत असताना शिवचरित्राचे वाचन करा, शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य सर्वच अठरापगड जातीतील मावळे सोबत घेऊन स्थापन केले.

कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली, गावागावात शिवछत्रपतींची मंदिरं नसली तरी गावागावातील मंदिराचा कळस आणि प्रत्येक घरात असणारी तुळस ही छत्रपतींमुळे शाबूत आहे. मायेचा सन्मान करण्याचे काम शिवछत्रपतींनी केले, परंतु आज काही ठिकाणी शिवजयंती साजरी करताना दारू पिऊन धिंगाणा घातल्या जातो, यामुळे जयंतीची मिरवणूक घरासमोरून जात असताना महिला भगिनी दार बंद करतात ही गोष्ट शिवछत्रपतीच्या विचारसरणीला मान्य नाही, मातांचा सन्मान आणि गोरगरीब उपेक्षित माणसाला न्याय देण्याची भूमिका ठेवा तेव्हाच शिवछत्रपतींची जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल.

यावेळी टाळमृदंगाच्या गजरात बोरगाव वैराळे येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. हभप गणेश महाराज साठे, हभप राधेशाम महाराज राऊत, हभप निलेश महाराज पाटील, हभप सागर महाराज बकाल यांनी केलेल्या गायनाने संपूर्ण गावात शिवभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गावातील प्रत्येक चौकात रांगोळी काढून शिवप्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.