old-pension-protest-akot
ताज्या बातम्या

चौथ्या दिवशीही कार्यालयात शुकशुकाट; काळे कपडे घालून अकोट येथील कर्मचार्‍यांचे निषेध

अकोट: जुनी पेन्शन सह इतर मागण्यांसाठी राज्यातील जिल्हा परिषद मध्यवर्ती संघटना, शासकीय व निमशासकीय संघटना तसेच शिक्षक व शिक्षकेतर संघटना अशा ७२संघटनांनी संप पुकारला आहे.आज संपाचा चौथा दिवस असून जुनी पेन्शन लागू होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे संपकरी यांनी आज सांगितले.

३५ वर्ष सेवा दिल्यानंतर म्हातारपणाचा आधार म्हणून पेन्शन जर मिळत नसेल तर ही आमची खूप मोठी फसवणूक असून राज्यघटनेने पेन्शनचा हक्क कर्मचार्‍यांना बहाल केलेला आहे त्यामुळे जुनी पेन्शन ही आमची रास्त मागणी असल्याचे संपकरी यांनी यावेळी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. कालपासून अकोट येथील कर्मचारी तहसील कार्यालयात उपस्थित राहून विविध माध्यमातून निदर्शने करीत आहेत.

त्या अंतर्गत आज चौथ्या दिवशी सर्व कर्मचा-यांनी तहसील कार्यालयासमक्ष हजर राहून काळे कपडे घालून निदर्शने केली. आज संपस्थळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप वानखडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य काशीराम साबळे, माजी तालुकाध्यक्ष संदीप आंग्रे,महासचिव रोशन पुंडकर. शरीफराना ,रामकृष्ण मिसाळ, विशाल आंग्रे, सिद्धेश्वर बेराळ, दिनेश सरकटे, सुनील अंबाळकर, पंकज भालेराव ,गौतम पचांग, जम्मू पटेल,पंजाबराव पाटील यांनी भेट देत संपास पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

आपण ज्या विद्यार्थ्यांना घडवित आहात ते उद्याचे भावी नागरिक आणि कर्मचारी असणार आहे त्यामुळे जुनी पेन्शन हा त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा आवश्यक आहे असे मत प्रदीप वानखडे यांनी व्यक्त केले.कुठलीही आवश्यकता भासल्यास आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या सोबत राहू असे आश्वासन भेटी देणा-यांनी दिले.अशाप्रकारे चौथ्या दिवशी अकोट पंचायत समितीमधील कर्मचार्‍यांनी संपात सहभागी होत लढा दिला.