क्रीडा

चेतन शर्मांनी दिली बीसीसीआय निवड समितीचा राजीनामा

नवी दिल्ली : स्टिंग ऑपरेशनमुळे वादात सापडलेले भारतीय क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआयने तत्काळ प्रभावाने त्यांचा राजीनामा मंजूर केलाय.

एका वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी चेतन शर्मांचे स्टिंग ऑपरेशन केले होते. यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले होते. चेतन शर्मा यांनी विराट आणि हार्दिक पांड्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

या स्टिंग ऑपरेशनमुळे वादात सापडलेल्या शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. चेतन शर्मा यांची बीसीसीआयमधील ही दुसरी टर्म होती.

मात्र त्यांना 40 दिवसांत राजीनामा द्यावा लागला. यापूर्वी टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. दरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शर्मांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.