अकोला

चला जाणू या नदीला’अभियान

तालुकास्तरावर नदी विकास आराखडा तयार करा; जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

अकोला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणू या नदीला’ या अभियाना अंतर्गत नदी संवाद यात्रा पूर्ण झाल्यानंतर त्या त्या नदी क्षेत्रात करावयाच्या विविध उपाययोजनांची कामे करण्यासाठी तालुकास्तरीय अधिकारी, सरपंच व नदी संवाद यात्री यांनी संयुक्त बैठका घेऊन नदी विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

‘चला जाणू या नदीला’, या अभियानाचा आढावा आज घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे तसेच नदी संवाद यात्री प्रमोद सरदार व अरविंद नळकांडे तसेच नदी यात्री तुषार हांडे तसेच नदी परिक्रमा झालेल्या गावचे सरपंच आदी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यातील पिंजरडा या नदीची उगम ते संगम ही नदी संवाद यात्रा पूर्ण करण्यात आली. तर अमरावती जिल्ह्यातून येणारी चंद्रभागा नदीच्या अकोला जिल्हा हद्दीतील एका गावातही यात्रा झाली आहे. नदीच्या या परिक्रमेत नदीच्या अस्वच्छतेची कारणे, तेथे झालेले अतिक्रमणे, मातीचे क्षरण, प्रदुषण इ. बाबत माहिती संकलन करण्यात आले असून या उपक्रमाद्वारे गावकर्‍यांच्या सहयोगातून ही कामे करावयाची आहेत.

त्यासाठी नदी खोर्‍यांचे नकाशे, पाणलोट क्षेत्र नकाशे, पर्जन्यनोंदी, अतिवृष्टी, अतिक्रमणे इ. माहिती घेऊन उपाययोजनांसाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी व गावचे सरपंच व ग्रामस्थांनी मिळून तालुकास्तरावर बैठका घेऊन नदी विकास आराखडा तयार करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी दिले.