बारामतीतील देशी गोवंश सुधारणा प्रकल्प व गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळेचे उद्घाटन
बारामती : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा देशी गोवंश सुधारणा प्रकल्प व गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळा हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी प्रयोग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथील भारतातील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्प (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट) आणि गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त रणजित पवार, सकाळ समूहाचे प्रताप पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान बदलू शकते. १९५२ साली भारतातून गिर जातीची गाय ब्राझीलमध्ये रेतन सुधारणा करण्यासाठी नेली असता ती गाय तेथे ६० लिटर दूध देवू लागली. त्याचे वीर्य जर दोन लिटर दूध देणाऱ्या गायीस दिले तर ती २० लिटर दूध देवू शकते. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाने दुधाचे उत्पादन वाढले तर शेतकरी समृद्ध व संपन्न होईल.
Live from program of Centre of Excellence for Genetic Improvement (Dairy) Project, Baramati https://t.co/njeTG0fPTL
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 11, 2023
ट्रस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे वीर्य उपलब्ध व्हावे. प्राण्यांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करून चांगल्या प्रकारचे उपचार मिळणे आवश्यक आहे. या ठिकाणी उत्तम प्रतीचे ब्रिड तयार करण्याचे फार्म तयार करावेत. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.
ऊस हे एक प्रकारचे ऊर्जा पीक आहे. त्याच्यापासून पारंपरिक पद्धतीने ऊस न घेता आपण इथेनॉल, बायो सीएनजी व ग्रीन हायड्रोजन इत्यादी उत्पादन घेवू शकतो. साखरेपासून हॅन्ड वॉश, फेस वॉश, हेअर वॉश, डिटर्जंट यासारखी उत्पादनेही तयार होत आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अशा प्रकारचे उत्पादन साखर कारखान्यातून घेण्याबाबत प्रयत्न केले जातील. शेतकऱ्याने भविष्यात ऊर्जादाताही बनणे आवश्यक आहे, असे श्री.गडकरी म्हणाले.
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणून नव्या युगाची सुरुवात केली असे सांगून त्यांनी ॲग्रीकल्चर ट्रस्टच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. शेती क्षेत्रात जागतिक स्तरावर होणाऱ्या संशोधनाची माहिती या ठिकाणी उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार शरद पवार म्हणाले, गेल्या काही वर्षापासून हाती घेतलेल्या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पाला आज सुरुवात झाली आहे. जगाच्या तुलनेत भारतात पशू संख्या जास्त आहे. परंतु दुधाच्या सरासरी संदर्भात आपण खूपच मागे आहोत. ॲग्रीकल्चर ट्रस्टच्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. शेतकऱ्यांनी दुधाकडे शेती पूरक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
कृषि विज्ञान केंद्रातील उत्कृष्ठ दर्जाचे कृषि तंत्रज्ञान, अटल इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, स्विमिंग पुल, राजीव गांधी सायन्स अॅण्ड इनोव्हेशन अॅक्टीव्हीटी सेंटर, देशी गोवंश सुधारणा प्रकल्प व गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळा सारखे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्याचा उपयोग बारामतीसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल.
विविध प्रकल्पांना भेटी
मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटन कार्यक्रमानंतर डेअरी ऑफ एक्सलन्सचा देशी गोवंश सुधार प्रकल्प, गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळा, अटल इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटरला भेट दिली. त्यांनी नवउद्योजकांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनीही प्रकल्पाबाबत माहिती दिली.
देशी गोवंश प्रकल्पाची उद्दिष्टे
दूध उत्पादक शेतकऱ्यांना पशु-पोषण, पुनरुत्पादन, पशुरोग निदान, खाद्य तपासणी आणि विस्तार सेवा उपलब्ध करून देऊन दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढवून पर्यायाने शेतकरी दुग्ध व्यवसायिकांचा नफा वाढवणे हा प्रमुख उद्देश आहे. पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र या प्रकल्पामध्ये देशी गोवंशामध्ये गीर आणि साहिवाल त्यासोबतच म्हैशींमध्ये मुऱ्हा आणि पंढरपुरी या दोन म्हशींच्या जातींचा समावेश केला गेला आहे. या प्रकल्पात सध्या ( IVF) एम्ब्रियो ट्रान्सफर मार्फत ब्राझिलियन आणि भारतीय गीर वासरांची निर्मिती करण्याचे काम चालू केले गेले आहे. या प्रकल्पामध्ये ॲनिमल न्यूट्रिशन,ॲनिमल जेनेटिक्स, डिसीज डायग्नोस्टिक, एम्ब्रियो ट्रान्सफर या विभागाच्या जागतिक दर्जाचे आधुनिक प्रयोगशाळा आहेत.