अकोट १८ फेब्रुवारी : आकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत दनोरीच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. सुनीता गोकुळराव आढे यांचे सह सहा सदस्यांनी सरपंच सौ. कान्होपात्रा नंदकिशोर वाघमारे यांचेवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या सर्व सदस्यांनी आपल्या प्रस्तावात सरपंचावर चार आरोप केले आहेत.
सरपंच सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, सदस्यांसोबत असभ्य वर्तणूक करतात, सरपंचाचा मुलगा श्याम नंदकिशोर वाघमारे हा ग्रामपंचायत कारभारात ढवळाढवळ करतो, दनोरी येथील पिण्याचे पाण्याची टाकी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता अथवा कोणताही ठराव न घेता पाडली असे आरोप सदस्यांनी घेतले आहेत.
या प्रस्तावावर गट ग्रामपंचायत दनोरीचे सदस्य सौ. सुनिता गोकुळराव आढे, अंजना प्रमोद बुटे, स्वाती ज्ञानेश्वर दाते, गजानन तुळशीराम आढे, चेतन ज्ञानेश्वर फुकट, राहुल वासुदेव पाखरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हा प्रस्ताव प्रभारी तहसीलदार अक्षय रासने यांचे समक्ष दाखल करण्यात आला आहे. त्यावर योग्य ती खातरजमा करून यासंदर्भात दिनांक २३.२.२०२३ रोजी गट ग्रामपंचायत दोरी येथे सकाळी ११.०० वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे.