अकोला प्रतिनिधी 21सप्टेंबर- पातुर तालुक्यातील आलेगाव येथील नलीनी प्रभाकर जोशी यांच्या मौजे आलेगाव गट नंबर 39 वर्णन असलेल्या खाजगी मालकीच्या जमिनीवर शासकीय योजनेतून व शासकीय निधीतून सार्वजनिक शेतकरी भवन बांधण्यासाठी सरपंच सचिवांनी बेकायदेशीररित्या परवानगी दिली.
याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाईचा प्रस्ताव सादर केला. मात्र याच प्रकरणात चान्नी पोलिसात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई होत नाही. दीड महिना उलटून गेला तरी पोलिसांना कारवाईचे मुहूर्त सापडत नसल्याने ही कारवाई दडपण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव आहे की काय अशी चर्चा आता व्हायला लागली आहे.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले, सखोल चौकशी केली सुनावण्या घेतल्या, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कारवाईचे प्रस्ताव सादर केले. पण ज्या प्रकरणात जिल्हाधिकारी निमा अरोरा गांभीर्याने कारवाई करतात ते प्रकरण चान्नी पोलिसांना मात्र फार काही विशेष गंभीर असल्याचे वाटत नाही. असेच चान्नी पोलिसांच्या वेळकाढू धोरणातून दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ज्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे प्रस्ताव सादर केले ते प्रकरण निश्चितच गंभीर आहे, पण तरीही चान्नी पोलीस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसाठी वेगळे कायदे आणि चान्नी पोलिसांसाठी वेगळे कायदे आहेत की काय असे प्रश्नही नागरिक उपस्थित करायला लागले आहेत.
ज्या प्रकरणाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा झाली, ज्या प्रकरणामुळे आलेगावची ग्रामपंचायत संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेत आहे. त्या प्रकरणात पोलिसांकडून चुकीचे काम करणाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न होत असेल तर नागरिकांचा पोलिसांवर विश्वास राहील कसा? असा प्रश्नही काही सुज्ञ नागरिक विचारायला लागले आहेत.
जर पोलिसांना या प्रकरणात काही तथ्य नाही असे वाटत असेल तर पोलिसांनी तसे जाहीर करावे, असेही काही नागरिक बोलत आहेत. पण पोलीस कारवाई सुद्धा करीत नाहीत आणि या प्रकरणाबाबत कोणती भूमिकाही घेत नाहीत. त्यामुळे त्यांनी पोलिसांबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम आणि अविश्वास निर्माण व्हायला लागल्याचे लोक बोलत आहेत. तेव्हा आता तरी पोलिसांवरचा विश्वास उडण्या अगोदर पोलिसांनी या प्रकरणात काहीतरी भूमिका घ्यावी अशी नागरिकांचे मागणी आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षकाकडे तक्रार
आलेगाव येथील शेतकरी भावनांचे अवैध बांधकाम बनावट दस्तावेज तयार करणे बेकायदेशीर ठराव घेणे या संदर्भात नलिनी प्रभाकर जोशी यांनी 4 ऑगस्ट रोजी चान्नी पोलिसात आलेगावचे सरपंच गोपाल गणपत महल्ले तत्कालीन सचिव अशोक देवकते आणि इतर जणांची तक्रार दाखल केली होती परंतु आजपर्यंत त्या तक्रारीवर कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्यामुळे 20 सप्टेंबर रोजी अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे
चान्नी पोलिसांकडे दिड पूर्वी तक्रार दाखल
आलेगाव येथील नलिनी प्रभाकर जोशी यांनी चान्नी पोलिसात दीड महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्यांच्या खाजगी जमिनीवर शासकीय निधीतून सार्वजनिक शेतकरी सभागृह बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने बेकायदेशीर रित्या परवानगी दिली. नियमानुसार खाजगी जमिनीवर अशा प्रकारे शासकीय निधीतून सभागृह बांधता येत नाही. ही परवानगी देण्यासाठी ग्रामपंचायतीने कायद्याचे उल्लंघन केले आहे. या तक्रारीनंतर चान्नी पोलिसांनी या शेतकरी भवन बांधकाम परवानगीशी संबंधित ठराव आणि या ठरावात गठित करण्यात आलेल्या ट्रस्ट मधील काही लोकांना जबाब देण्यासाठी नोटीस दिल्या होत्या. त्यातील काही लोकांनी आपले जबाब सुद्धा नोंदविले. या जबाबांमधून आणखी भयानक प्रकार समोर आलेत. पण एवढे सर्व झाल्यानंतरही दीड महिना उलटून गेला तरी पोलिसांना या प्रकरणात कोणावरही कारवाई करण्यात आली नाही.