नवी दिल्ली : पंजाबमध्ये हिंसाचार माजवण्याचे प्रयत्न करणारे खलिस्तान समर्थक 6 युट्यूब चॅनल्स सरकारने ब्लॉक केले आहेत. हे चॅनल्स खलिस्तानला समर्थन देऊन हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
यासंदर्भात माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्वा चंद्रा म्हणाले की, मागील 10 दिवसांत विदेशातून चालवण्यात येणारे 6 ते 7 युट्यूब चॅनल ब्लॉक करण्यात आले आहेत. पंजाबी भाषेत भडकाऊ व्हिडीओ तयार करण्यात येत होते. त्यामुळे या चॅनलवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
कट्टर खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह यांच्या समर्थकांनी एका साथीदाराच्या सुटकेची मागणी केली होती. या मागणीसाठी अमृतपाल सिंह समर्थकांनी अजन येथील पोलीस ठाण्यात तलवारी आणि बंदुकीसह हल्ला केला होता. त्यानंतर 6 युट्यूब कारवाई करण्यात आली आहे. अमृतपाल सिंह याला गेल्यावर्षी दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांचे मूळ गाव मोगायेथे येथे कार्यक्रमात ‘वारिस पंजाब दे’ याचे प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. ‘वारिस पंजाब दे’ याची स्थापना दिवंगत अभिनेता दीप सिद्धू यांनी केली होती.
दरम्यान आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, युट्यूब चॅनलला 48 तासांच्या आत ब्लॉक करण्याच्या सरकारच्या विनंतीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारने युट्यूबला आक्षेपार्ह कंटेट ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि अल्गोरिदम याचाही वापर करण्यास सांगितले आहे. मात्र भारतात यूट्यूबला काही समस्या येत आहेत. कारण व्हिडिओ कंटेट प्रादेशिक भाषांमध्ये अपलोड केला जात आहे. युट्यूबची प्रणाली सध्या फक्त इंग्रजी भाषेतील कंटेट ओळखण्यास सक्षम आहे. त्यामुळे युट्यूबवर अपलोड होणाऱ्या इतर भाषेतील व्हिडीयोसंदर्भात कारवाई होत नसल्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन हे युट्यूब चॅनल्स ब्लॉक केले आहेत.