मुंबई

कोळी बांधवांचे समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडं !

मुंबईतील कोळीवाडे, गावठाणे आणि मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यासाठी कोळी बांधवांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडं !

मुंबई : मच्छिमारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, कोळीवाडे, गावठाणे नष्ट करण्याचे षडयंत्र, कोळी भूमिपुत्र समाजाचे जमीन हक्क अधिकार डावलण्याचे प्रकार अशा अनेक विषयासंदर्भात न्याय मिळण्यासाठी कोळी बांधवांनी थेट केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला यांच्याकडे साकडं घातलं आहे. चारकोप कोळी युवा संस्था, (चारकोप कोळीवाडा), कोळीवाडा गावठाण सेवा समिती आणि ठाणे गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समिती या संस्थांनी केंद्रीय मंत्री रूपाला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

केंद्रीय मत्स्य व्यवसाय (पदुम) मंत्री परशोत्तम रूपाला यांनी मुंबईतील सागर परिक्रमेत कोळी, सागरी पुत्र, भूमिपुत्रांचे मत्स्य व्यवसायाचे मुंबई शहरातील प्रमुख व्यापाराचे केंद्र असलेल्या ” भाऊचा धक्का ” येथे भेट दिली. त्यावेळी चारकोप कोळी युवा संस्थेचे ( चारकोप कोळीवाडा) अध्यक्ष धीरज भंडारी व महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ लिमिटेडचे माजी अध्यक्ष रामदास संधे यांच्यासह कोळी बांधवांनी केंद्रीय मंत्री रूपाला यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कोळीवाडे, गावठाणे येथील सागरी किनारपट्टीवर राहणाऱ्या भूमिपुत्रांच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदने दिली.

मच्छिमारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या तसेच मच्छिमार समाज जेथे वर्षानुवर्षे वास्तव्यास आहे त्या कोळीवाडे, गावठाणे नष्ट करण्याचे षडयंत्र चालू आहे. कोळी भूमिपुत्र समाजाचे जमीन हक्क अधिकार डावलण्यात येत आहेत, कोळीवाडे गावठाणे यांचे सिमाकंनाचे काम मुंबई महापालिका व शासनाच्या अधिकारी वर्गाच्या वतीने जाणीवपूर्वक चुकीचे पध्दतीने करण्यात येत आहे अशा विविध समस्यांचे निवेदन कोळी बांधवांनी केंद्रीय मंत्री रूपाला यांना दिले. या विषयावर विस्तृत चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्रयांनी कोळी बांधवांना दिल्लीचे आमंत्रण दिले.

या आहेत मागण्या …

  • मुंबई उपनगर आणि मुंबई शहर शच्या कोळीवाडयांचे, गावठाणांचे विस्तारित सिमांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावे.
  • सिमांकन पूर्ण करून नवीन विकास नियंत्रण नियमवाली कोळीवाडा आणि गावठाण साठी अस्तिवात आणणे.
  • Coastal Zone Management Plans (CZMP) नकाशे तयार करताना मुंबई उपनगर, मुंबई शहर, मुंबई महानगर प्रदेश ( MMR रिजन ) तसेच महाराष्ट्रतील सर्व सागरी किनारपट्टीवरील कोळीवाडे, गावठाणे दाखविण्यात यावी.
  • मुंबईतील अति प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास करून झालेला विकास त्यामुळे मत्स्यउद्योग संपुष्टात येत चालला आहे त्या करिता मुंबई किनारपट्टी वर नवीन येणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास करून होणाऱ्या योजना पुर्णपणे थांबवाव्या आणि पर्यावरण पूरक योजना तयार कराव्या व त्या योजनांच्या वर काम करण्यासाठी कुशल कामगार म्हणून कोळी भूमिपुत्रांना प्रशिक्षित करून कोळी भूमिपुत्र समाजाच्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत.