cows-diesd-in-kolhapur
महाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये ५२ गायींचा मृत्यू, ३० गंभीर:कणेरी मठातल्या घटनेने एकच खळबळ

मुंबई: कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठातल्या ५२ गायींचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी पंचमहाभूत सुमंगलम् लोकोत्सव सुरू होता. तिथे ही घटना घडली.शिळ्या अन्नातून विषबाधा होऊन हा प्रकार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेमध्ये अजून ३० गायी गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या लोकोत्सवाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर गुरुवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद्र गहलोत मठावर होते. मठावर हजारोंच्या संख्येने गायी असून सध्या जनावरांचे प्रदर्शन सुरू असल्यामुळे ही मोठ्या संख्येने जनावरे आणण्यात आली आहेत.

शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता

गायींचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर पठाण यांनी दिली. या जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती फॉरेन्सिक कडून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.मठाचे अधिपती काढसिध्देश्वर स्वामी यांना विचारले असता ते म्हणाले की, कणेरी मठावर घडलेली घटना हा एक दुर्दैवी अपघात आहे. कोणीतरी अज्ञानापोटी हे केलेले आहे. जाणीवपूर्वक कोणी करणार नाही. रस्त्यावरील गायी आणून त्यांचा सांभाळ करणारे आम्ही आहोत. त्यामुळे या गोष्टीचा सगळ्यात मोठे दुःख आम्हाला आहे.