अकोला

कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकर्‍यांच्या बांधावर, अवकाळीच्या नुकसानीची केली पाहणी

मुंबई: मराठवाड्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, परिस्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच अधिकार्‍यांना सूचना केल्या.

सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे असे निर्देश सत्तार यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा मोठा फटका रब्बीच्या पीकांना बसतोय. काढणीला आलेले गव्हाची पीकं अक्षरशः आडवी झाली आहेत. तर ज्वारीच्या पिकाचे देखील नुकसान झाले आहेत. तसेच फळबागांना देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आधी अतिवृष्टीमुळे खरिपाचे हंगाम गेले आणि आता अवकाळी पावसाने रब्बीच्या पीकांचे नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना तत्काळ मदत करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडून देखील पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. तर आज खुद्द कृषीमंत्री सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, शेतकर्‍यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असले तरीही प्रत्यक्षात शेतकर्‍यांना मदत कधी मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरेल. राज्यातील सरकार हे शेतकर्‍यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकार्‍यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील अंबडच्या वडीगोद्री येथील अवकाळी पाऊस व वादळीवारा यामुळे नुकसान झालेल्या गहू पिकाची पाहणी केली.