राजकीय

कुठल्याही परिस्थिती शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्या ; तारांकित प्रश्नांद्वारे छगन भुजबळ यांची सभागृहात मागणी

अवकाळीसह अनेक संकटांनी शेतकरी अडचणीत त्यांची वीज तोडली जाऊ नये -छगन भुजबळ

मुंबई, नाशिक, दि.१५ मार्च : अवकाळीसह अनेक संकटांनी शेतकरी अडचणीत आला आहे. यातून पुन्हा उभे राहण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतांना त्यांची वीज खंडित केली जाते. त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत येत आहे. त्यामुळे शेतकरी जोपर्यंत अडचणीत आहे तो पर्यंत शेतकऱ्यांची वीज तोडली जाऊ नये. तसेच शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थिती दिवसा ठरविक वेळेत वीज उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात केली.

वीज पुरवठयाअभावी पिकांचे होत असलेले नुकसानीबाबत उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले की, एकीकडे दुरुस्त झालेला ट्रान्सफार्मर लावला की तो दुसऱ्याच दिवसी नादुरुस्त होतो अशी सद्याची परिस्थिती आहे. तसेच महावितरण शेतकऱ्यांना आठ तास दिवसा आणि आठ तास रात्री वीज उपलब्ध करून देते असे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात दिवसा वीज उपलब्ध करून दिली जात नाही ही सत्यता आहे. ती प्रत्यक्षात पडताळून पहावी. तसेच कुठल्याही परिस्थितीत दिवसा ठराविक वेळ ठरून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यात यावी आणि अवकाळीसह अनेक संकटांनी शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी जोपर्यंत अडचणीत आहे तो पर्यंत त्याची वीज तोडण्यात येऊ नये अशी मागणी सभागृहात केली.

दरम्यान यावर उत्तरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ट्रान्सफार्मरच्या येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आरडीएसएसच्या योजनेच्या माध्यमातून ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविण्यात येत आहे. यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालवधी लागणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यास प्रयत्न सुरु आहे. सोलर फेडररायजेशन योजना जलद गतीने राबविण्यात येईल अशी माहिती दिली.