मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावाद जगजाहीर आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरुन भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला मात्र भारताने याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत परिषदेत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उकरुन काढताच भारताने पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत.
UNHRC परिषदेत भारताच्या प्रतिनिधी सीमा पुजानी यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना म्हटलं की, ‘पाकिस्तानमध्ये इतर अडचणी आहेत. जनता त्रास सहन करत आहे. तुमचे दोन वेळेच्या खायचे वांदे, आधी स्वत:कडे बघा.’ संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला पण भारताने पाकिस्तानला चांगलं सुनावलं आहे.
भारताच्या प्रतिनिधी सीमा पुजानी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानची खरडपट्टी काढत त्याला आरसा दाखवण्याचे काम केलं आहे.पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हिना रब्बानी यांनी काश्मिरींबाबत भारतावर खोटे आरोप केले. मात्र, भारताने त्यांच्या सर्व आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय प्रतिनिधी पुजानी यांनी म्हटलं की, ‘पाकिस्तानचे लोक त्यांचं आयुष्य, उपजीविकेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढत आहेत, पण पाकिस्तान भारतावर खोटे आरोप करणं सोडत नाहीत. मी पाकिस्तानच्या नेतृत्वाला आणि अधिकार्यांना सल्ला देतो की, त्यांनी निराधार प्रचाराऐवजी लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी आपली ऊर्जा वापरावी. पाकिस्तानच्या प्रतिनिधीने भारताचा अपप्रचार करण्यासाठी या व्यासपीठाचा पुन्हा एकदा गैरवापर केला आहे.’
सीमा पुजानी म्हणाल्या की, ‘आज पाकिस्तानमध्ये कोणताही धार्मिक अल्पसंख्याक मुक्तपणे जगू शकत नाही किंवा त्यांचा धर्म पाळू शकत नाही. जगभरातील हजारो नागरिकांच्या मृत्यूला पाकिस्तान थेट जबाबदार आहे. पाकिस्तानच्या चौकशी आयोगाला गेल्या दशकात ८ हजार ४६३ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. पाकिस्तानच्या धोरणांचा फटका निष्पाप जनतेला बसला आहे. अनेक विद्यार्थी, डॉक्टर, अभियंते, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते अचानक गायब झाले आहेत.’