Kalwa-hospital
महाराष्ट्र मुंबई

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नातेवाईकांसाठी जेवणाची विनामूल्य सोय !

ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांसाठी जेवणाची विनामूल्य सोय करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने अक्षय चैतन्य संस्था आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या साथीने हा उपक्रम नुकताच सुरू केला आहे.

सुरुवातीला दुपारी १२ ते २ या काळात ही सुविधा उपलब्ध असून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन सायं. ७ ते ९ या काळातही भोजनाची सोय करण्याचा विचार असल्याचे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. सध्या सरासरी १५० ते २०० नातेवाईक या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठिकठिकाणचे रुग्ण येतात. प्रत्येकापाशी पुरेसे मनुष्यबळ नसते. त्यामुळे सोबतीला असलेल्या नातेवाईकावर चांगलाच ताण येतो. अशात त्याला जेवणाची चिंता अधिक त्रासदायक ठरते. त्यातून मार्ग काढण्यासाठी अक्षय चैतन्य संस्थे पुढाकार घेतला. भायखळा येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहात जेवण तयार केले जाते. मग मोठ्या डब्यातून ते संबंधित ठिकाणी पोहोचवले जाते. महापालिकेने त्यांना हॉस्पिटलच्या परिसरातीत रात्र निवारा इमारतीत तळमजल्यावर जेवण वाढण्यासाठी जागा दिली आहे.

भात, डाळ, भाजी असे नेहमीचे जेवण असते. सुटीच्या किंवा सणाच्या दिवशी गोड पदार्थाचाही जेवणात समावेश केला जातो. अन्नाची नासाडी होऊ नये, ते वाया जाऊ नये, या साठी संस्थेचे स्वयंसेवक काळजी घेतात.

रुग्णांसोबत येणारे नातेवाईक हे चिंतेने गांजलेले असतात. रुग्णांच्या जेवणाची सोय रुग्णालयातर्फे केली जाते. मात्र, नातेवाईकांना घरून डबा आणणे किंवा बाहेरचे खाणे हाच पर्याय असतो. त्यांचा ताण हलका करण्यासाठी आयुक्तांनी केलेल्या पाठपुराव्यातून विनामूल्य भोजनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याशिवाय, रुग्णालय प्रशासानाने त्यांना रात्र निवारा, स्वच्छतागृहे याही सुविधा दिल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी जास्तीच्या खिडक्या उघडणे. तपासणी-चाचण्या यांच्यासाठी जास्तीच्या सुविधा देणे. परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य, तसेच, नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागाचे अद्ययावतीकरण आदी गोष्टींची सुरूवात बांगर यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर झाली आहे. त्यात, नातेवाईकांसाठी विनामूल्य भोजन सुविधाही आता समाविष्ट झाली आहे.

वाचनालयही लवकरच…

एखादी व्यक्ती आजारी पडली तर रुग्णांसहीत नातेवाईकांची तारांबळ उडते. मानसिक ताणतणाव वाढतो, अशावेळी रुग्णांना धीर देण्यासाठी, मानसिक आधार देण्यासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांच्यासह रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्याचे ठरवले आहे. त्याची कार्यवाही सुरू असून लवकरच ही सुविधाही मिळणार आहे.