कल्याण दि.16 मार्च : आत्तापर्यंत आपण फादर्स डे, मदर्स डे इतकंच काय तर व्हॅलेंटाईन डेपर्यंतचे वेगवेगळे डे साजरे होताना पाहिले आहेत. मात्र कल्याणात दर रविवारी होणाऱ्या एका अनोख्या डेची चर्चा आणि सोबतच कौतूकही केलं जात आहे. हा डे आहे, गोर गरिबांचं पोट भरणारा रोटी डे. समाजातील गरीब- गरजू लोकांसाठी सुरू झालेला माणुसकीचा यज्ञ म्हणजेच रोटी डे. आपण जाणून घेऊया अन्नदानाच्या आनंददायी उपक्रमाविषयी.
आपल्या संस्कृतीमध्ये अन्नदानाला पूर्वीपासूनच मोठे महत्व आहे. भुकेल्याला अन्न देणं यापेक्षा मोठा आनंद आणि समधान ते कोणते असू शकेल. परंतू ते करत असताना देणाऱ्यामध्ये उपकार केल्याची आणि घेणाऱ्यामध्ये स्वाभिमान दुखवण्याची भावना निर्माण होऊ नये. तरच त्यातून दोघांनाही जे हवं आहे ते मिळू शकते. आणि याच सकारात्मक मानसिकतेतून गेल्या पाच सहा वर्षांपासून कोणताही गाजावाजा न करता रोटी डेचा हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे.
सीए, डॉक्टर, वकीलांसह नोकरदार व्यक्तींचा समावेश…
कल्याणसह आसपासच्या परिसरात असणाऱ्या गोर गरीब लोकांना त्यातही लहान मुलांना एकदा तरी पोटभर आणि पौष्टिक जेवण मिळावे, या उद्देशाने रोटी डे ची चळवळ सुरू झाली. आणि आज एक यशस्वी सामाजिक चळवळ म्हणून ती नावारूपाला आली असून ज्यामध्ये कल्याणातील सीए, डॉक्टर, वकीलांसह अनेक नोकरदार आणि नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. ज्यानं आपल्या या कामाबद्दल ना प्रसिद्धीचा मोह आहे न कौतुकाची हाव.
समाजात असे अनेक जण आहेत ज्यांना पंचपक्वान्न तर दूरच पण साधं एकवेळचे पोटभर जेवणही मिळत नाही. मग श्रीखंड पुरी, आमरस पुरी, बिर्याणी आदी पदार्थ म्हणजे एक असे दिवास्वप्न,जे प्रत्यक्षात येणं केवळ अशक्यच. मात्र कल्याणातील संवेदनशील व्यक्तींनी त्यांचे हे दिवास्वप्न आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरवले आहे.
दर रविवारी आनंद सोहळा…
दर रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रोटी डेची ही टीम सुमारे 300 – 400 लोकांचे जेवण तयार करून वीटभट्टी परिसर, झोपडपट्टी परिसरात पोहोचते. आणि मग सुरुवात होते ती एका अशा आनंद सोहळ्याची, ज्याचे वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. मात्र शब्दांविनाही याठिकाणी उत्कट असा संवाद सुरू असतो. ज्याचे प्रतिध्वनी, देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांतून, चेहऱ्याच्या हाव भावांतून ओसंडून वाहत असतात.