केंद्र सरकारची उच्च न्यायालयात माहिती
औरंगाबाद : उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण होणार असल्याची माहिती बुधवारी केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. मात्र, औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्याबाबतची प्रक्रिया अद्याप विचाराधीन असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
जुलै 2022 मध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे या तीन व्यक्तींनी मिळून ही याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर बुधवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाली. या नामकरणाविरोधात केंद्र सरकारकडून आक्षेप, सूचना हरकती मागवण्यात आल्या आहेत का? जर केंद्राकडून अद्याप सूचना हरकती मागवल्या नाहीत, तर याचिकाकर्त्यांची घाई का? अशी विचारणा हायकोर्टाने केली होती.
तसेच केंद्र आणि राज्य सरकारला प्रतिज्ञापत्रावर उत्तर सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले होते. त्यानुसार, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी हायकोर्टाला दिली.
तसेच औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव हा विचाराधीन असल्याचेही यावेळी न्यायालयाला सांगितले. दुसरीकडे, यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी हायकोर्टाकडे आणखीन वेळ मागून घेतला.
त्यांची ही विनंती मान्य करत हायकोर्टाने याप्रकरणाची सुनावणी 27 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे. यामुळे पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र या माहितीतून औरंगाबादचे अद्याप अधिकृतरीत्या संभाजीनगर झाले नाही हे स्पष्ट झाले आहे.