Neelam-Gorhe
ताज्या बातम्या महाराष्ट्र

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा सभापतींचे राज्य सरकारला निर्देश

मुंबई – छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचे उदात्तीकरणाचे प्रकार वाढीस लागले आहेत. हे प्रकार निंदनीय आणि चिड आणणारे आहेत. राज्य सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून धागेदोरे तपासावेत. वेळ पडल्यास एमपीडीए अंतर्गत तडीपारची कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्य सरकारला दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर मध्ये काही लोकांकडून नामंतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. वादग्रस्त विधाने करून लोकांमध्ये चीड निर्माण केली जात आहे. आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या मुद्द्याकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी करण्याची मागणी दानवे यांनी केली.

संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत उत्तर दिले. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाल्यापासून अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. बहुतांश त्यातील चीड आणि संताप आणणारे आहेत. बारकाईने याकडे पाहिल्यास देशद्रोही ठरेल, अशी विधाने आहेत. सरकारकडून या आक्षेपार्ह बाबीची गंभीर दखल घेतली जाईल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करून त्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकवले जात आहेत. हा प्रकार निंदनीय असून चिड आणणार आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण कशासाठी सुरू आहे. सरकारने हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वरिष्ठ अधिकारी नेमून याबाबतचे धागेदोरे तपासा. लोकांचे संयम सुटणार नाही याची काळजी घ्या. वेळ पडल्यास एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी, अशा सूचना सभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिल्या.