ताज्या बातम्या

उन्हाचा चटका वाढला, लिंबाच्या मागणीत वाढ; किलोला मिळतोय ८० ते १०० रुपयांचा दर

अकोला : सध्या राज्यात तापमानात चढ उतार होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानाचा पारा वाढल्यानं बाजारपेठेत लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. लिंबाची मागणी वाढल्यानं लिंबाचे दरही दुपटीनं वाढल्याचं चित्र दिसत आहे.

जिल्ह्यातील घाऊक बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांकडून ८० ते १०० रुपये प्रति किलो दरानं लिंबाची विक्री केली जात आहे.राज्याच्या अनेक भागात उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. तापमान वाढल्यानं लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. लिंबाचे दर वाढल्यानं शेतकर्‍यांना फायदा मिळत आहे. ८० ते १०० रुपये प्रति किलोने लिंबाची विक्री होत आहे. तर बाजार समितीत लिंबाला ६० ते ७० रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे.

लिंबाला चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी आहेत. उन्हाळ्यात उन्हापासून बचावासाठी लिंबू सरबत किंवा इतर शीतपेयांमध्ये लिंबाचा वापर केला जातो. त्यामुळं उन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते.

महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लिंबाचं उत्पादन घेतलं जाते. मात्र, काही वेळाला हवामानातील बदलाचा मोठा फटका लिंबू उत्पादक शेतकर्‍यांना बसतो. महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानच्या मार्केटमध्ये लिंबू पाठवली जातात. आंध्र प्रदेश सर्वात जास्त लिंबाचे उत्पादन करणारे राज्य आहे. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो.

लिंबू पाण्यात शरीराला आवश्यक असणारी अनेक पौष्टीक तत्व असतात. तसेच यापैकी काही पौष्टीक तत्व वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. यामध्ये पेक्टिन असतं. ज्यामुळे सतत लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. लिंबातील फ्लेवोनॉयड्स शरीरातील मेटाबोलिज्म वाढवतात. मेटाबोलिज्म वजन कमी करण्यासाठी मदत करतं. दररोज लिंबू पाणी प्यायल्यानं शरीराची सूजही कमी होते. तसेच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचं कामही लिंबू पाणी करतं. लिंबामध्ये पोटॅशियम असंत, ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात मात्र, लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मागणी वाढल्यानं दरात वाढ होते. याचा शेतकर्‍यांना चांगला फायदा होत आहे.