Political discussion on Uddhav Thackeray and Kejriwal meeting
राजकीय

उध्दव ठाकरे आणि केजरीवाल भेटीवर राजकीय चर्चा, कोण काय म्हणाले …

मुंबई : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिवसेनेची सुप्रीम कोर्टातील लढाई ठाकरेच जिंकतील, असा विश्वास व्यक्त करीत, या नात्याला आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि वरचेवर भेटू’ असं म्हणून अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे आणि आपच्या नव्या नात्याचं सूतोवाच केलं. तसेच मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही पंजाब आणि महाराष्ट्राचे देशाच्या स्वातंत्रयात मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून, विरोधकांकडून टीका होत आहे.

आम्ही २०२४ ची तयारी सुरू केली : संजय राऊत

अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, ‘२०२४ ची आम्ही तयारी सुरू केली आहे. केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यासोबत काही भूमिकांवर चर्चा झाली. केजरीवाल ‘आप’लाही कोर्टात जाऊन न्याय मिळवावा लागतो’ याकडेही लक्ष वेधले.

सर्व राजकीय पक्षांना जाणीव होतेय : प्रकाश आंबेडकर

ठाकरे आणि केजरीवाल यांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘बऱ्यात ठिकाणी चर्चा चालू आहे. मध्यंतरी तेलगंणाचे मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केली होती. आता केजरीवाल करत आहे. माझं जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली होती. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, सर्व राज्यांचे मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे ‘.आता सर्व राजकीय पक्षांना जाणीव होत आहे, शासनाचा राजकीय पक्षात हस्तक्षेप वाढलेला आहे. शिवसेनेचा जो निर्णय आला, त्यांच्यातून हे दिसतं आहे. सुप्रीम कोर्टाने जसं म्हटलं की निवडणूक आयोगाने निकालावर आम्ही आता काही करणार नाही. मला वाटतं संविधानाला हे धरून नाही’, असंही ते म्हणाले आहेत.

कुपोषित बालकासोबत मैत्री….: पाटलांचा टोला

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर बोलताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी ही टीका केली आहे. मित्र मिळाला तर तो पहिलवान असला पाहिजे, कुपोषित बालकासोबत मैत्री करून काय फायदा, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

छोटा रिचार्ज भेटून गेला : ओवेसींची मिश्किल टीका

उद्धव ठाकरे यांना अरविंद केजरीवाल एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी मिश्किल टिपण्णी केली आहे. उध्दव ठाकरेंना छोटा रिचार्ज भेटून गेला असे भाष्य केले. ए.आय. एम. आय. एम. चे पहिलेच राष्ट्रीय आधिवेशन मुंबईत होत आहे. याचीच माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे केजरीवाल भेटीवर भाष्य करीत टीका केली.

खलिस्तानवाद्याचं समर्थन करणा-यांना….: नितेश राणे

ठाकरे केजरीवाल भेटीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही या भेटीवरून ट्विट करत उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे नितेश राणे म्हणाले की, आधी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीचे समर्थन करणा-यांसोबत मुख्यमंत्री झाले आता खलिस्तानवाद्याचं समर्थन करणा-या मुख्यमंत्रयांना भेटतात. यावरून हेच सिध्द होते जन्माने संपत्तीत वारसा मिळतो पण आमचे हिंदुह्रदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.