igatpuri-accident
ताज्या बातम्या

इगतपुरीजवळ अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ भीषण अपघात होऊन चार जण जागेवरच ठार झाले. यात एका लहान मुलीचा समावेश आहे तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल दुपारी चार वाजेच्या सुमारास पंढरपूरवाडीसमोर नाशिकहून मुंबईकडे जाणारी एसेंट कार एम.एच. 04 एफ.ए. 8291 ही गाडी भरगाव वेगाने जात असताना गाडीचा पुढील टायर फुटल्याने ही कार थेट उडून मुंब्रा येथून नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर एम.एच. 15 एफ. एफ. 4449 कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅन एम.एच. 43 इ.डी. 3088 या टोईंग व्हॅनवर जोरदार आदळल्याने भीषण अपघात झाला.

अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात होंडा एसेंट कारचा चक्काचूर झाला. या अपघातात एक लहान मुलगी, महिला व दोन पुरुष जागेवर ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघाताची माहिती समजताच महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन कारमधील अडकलेल्या सर्व जखमींना बाहेर काढून सर्व जखमींना जगत्‌‍गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक कैलास गतीर व टोलप्लाझाची रुग्णवाहिका यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासले असता चार जण मयत घोषित केले.

या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस हवालदार संजय क्षीरसागर, सुनील खताळ, संजय गांगुर्डे, जगदीश जाधव, कैलास गोरे, विक्रम लगड तसेच महिंद्रा कंपनीची टीम यांच्यासह टोलप्लाझाचे कर्मचारी यांनी मदत करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.