अकोला : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील गरीब घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी शाळा स्तरावर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यातील १९० शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केली असून संबंधित शाळांमध्ये आरटीईच्या एक हजार ९४६ जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. या जागांवर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी प्रवेश घेवू शकतील.बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अंतर्गत समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.
गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे.
पालकांना यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. परंतु तत्पूर्वी शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. नोंदणीकडे सुरुवातीला शाळा व्यवस्थापनाने फारसे लक्ष दिले नाही.दरम्यान शाळा नोंदणीच्या शेवटच्या दिवसाअखेर जिल्ह्यातील १९० शाळांनी नोंदणी केली.
संबंधित शाळांमधील एक हजार ९४६ जागा आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करणार्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक प्रत्येक वर्षी शिक्षण विभागामार्फत जारी करण्यात येते.
त्यानंतर पालक त्यांच्या पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करतात. दरम्यान आता शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने वेळापत्रक शासन स्तरावरून जाहीर करण्यात येईल