RTE
अकोला

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी पाच दिवसांत १,६२२ अर्ज

अकोला: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियमांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी पाच दिवसात पालकांकडून १ हजार ६२२ अर्ज करण्यात आले. प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला असून, १७ मार्चला रात्री १२ वाजतापर्यंत अर्ज करता येणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगीविना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

आरटीईमुळे पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. दरम्यान २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आरटीईअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रथम शाळांची नोंदणी आणि आता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती.

मात्र प्रारंभी या नोंदणी प्रक्रियेकडे काही व्यवस्थापनातील शाळांनी फारसे लक्ष दिले नाही. पाठपुरावा केल्यानंतर नोंदणी प्रक्रियेला वेग आला. नोंदणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत १९० शाळांनी नोंदणी केली. संबंधित शाळांमधील १ हजार ९४६ जागा आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करणार्‍या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या आहेत.

आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी पालकांकडून प्रतिसाद मिळत आहे. अर्ज करण्याची गती वाढतच असून, सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन साईट स्लो होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी संभ्रमातन पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले.