MLA-Saroj-Ahire
महाराष्ट्र राजकीय

आमदार सरोज अहिरेंना अश्रू अनावर ….

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे आपल्या तान्हुल्यासह आज अधिवेशनात दाखल झाल्याने आई व लोकप्रतिनिधी अशी दुहेरी भूमिका निभावत आहेत. मात्र बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षामध्ये सोयी सुविधा नसल्याने त्यांना काही वेळातच विधीमंडळातून काढता पाय घ्यावा लागला. विधानभवनातील हिरकणी कक्षाच्या दुरावस्थेवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. बाळाची गैरसोय झाल्याने अहिरेंना अश्रू अनावर झालं होतं.

विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या. बाळाची तब्येत खराब असून हिरकणी कक्षात योग्य ती सुविधा न मिळाल्यानं अहिरे यांनी नाराजी व्यक्त केली. मी आमदार असले तरी एक आई आहे, माझ्या बाळाची गैरसोय झालेली सहन होणार नाही ” असं वक्तव्य करत अहिरे यांनी संताप व्यक्त केला.

विधानभवनातून/ संतोष गायकवाड

आठ दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष भेटले नसल्याने प्रधान सचिवांना हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यासाठी पत्र दिलं होतं. पण, तेथे कोणतीही व्यवस्था झालेली नाही. अशा परिस्थितीत माझ्या आजारी बाळाला तिथे ठेऊ शकत नाही. बाळासाठी सरोज अहिरे यांनी अधिवेशन अर्धवट सोडलं. तसेच पत्र देऊनही हिरकणी कक्षाबाबत दखल न घेतल्यानं अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली.

आई आणि लोकप्रतिनिधी दोन्ही कर्तव्ये

मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. आपल्याला उद्यापर्यंत व्यवस्थित हिरकणी कक्ष मिळाला नाही, तर मी मतदारसंघातील जनतेची माफी मागून मतदारसंघात परत जाणार आहे, असा इशाराही आमदार अहिरे यांनी दिला आहे.