राजकीय

आदिवासी मुलांचा वेठबिगारीसाठी वापर !

राज्य सरकारची कबुली : विरोधकांकडून संताप

मुंबई: आदिवासी मुलांचा वेठबिगारीसाठी वापर होत असल्याची कबुली राज्याचे आदिवासी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. कामगार विभागाकडून आतापर्यंत २८ मुलांची सुटका करण्यात आली असून, संबंधित दलालांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्या मुलांचे पुनर्वसन करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती डॉ गावित यांनी दिली. आदिवासी मुलांना वेठबिगारीसाठी विक्री केली जात असल्याने विरोधकांनी राज्यसरकारवर संताप व्यक्त केला.

राज्यातील आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेंच्या अन्नधान्य खरेदीच्या प्रश्नावर आमदार रमेश पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर चर्चा सुरू होती. यावेळी आदिवासी मुलांची विक्री होत असल्याची बाब सदस्यांनी उपस्थित केली होती. आदिवासी मुलांचा वापर वेठबिगारीसाठी होत असल्याच्या आदिवासी मंत्र्यांच्या उत्तरानंतर सदस्य एकनाथ खडसे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. गरिबीमुळे आदिवासी मुलांची विक्री होत असेल तर सरकारने १०० योजना करून काय फायदा ? असा संताप व्यक्त करीत या प्रकारावरून सरकारला खडसावले. राज्यात वेठबिगारी बंदी कायदा केला असताना मंत्री खुद्द कबुली देत असल्याबाबत सदस्य कपिल पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आदिवासी मुलांना ३ ते ४ हजार रुपयात विकल्याची घटना सांगतील. इगतपुरी येथील एका गावात एका १० वर्षाच्या मुलीला विकण्यात आले. त्या मुलीकडून शेण काढणे, जनावरे सांभाळणे अशी विविध काम करून घेतली जायची. मात्र ती मुलगी आजारी पडल्यानंतर त्या मुलीला अर्धा रात्री त्या कुटुंबाच्या दारात टाकण्यात आले. त्यानंतर त्या मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी केली.

२८ मुलांची सुटका : दलालाविरोधात गुन्हा

यावर उत्तर देताना आदिवासी मंत्री विजय कुमार गावित यांनी सांगितले कि, राज्यात ४९९ आश्रम शाळा कार्यरत आहेत. २०१७ ते २०२२ या पाच शैक्षणिक वर्षात विविध कारणांनी ५९३ मुलांचे मृत्यू झाले त्यापैकी ५४४ मुले हि पालकांच्या ताब्यात असल्याची आढळून आली. ठाणे पालघर जिल्ह्यात मेंढपाळ व्यवसायात मुलांचा वेठबिगारीसाठी वापर झाला आहे. यातील २८ मुलांची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी त्याहाने जिल्ह्यातील शहापूर , विक्रमगड पालघर मोखाडा अश्या एकूण १६ मुलांना आश्रमशाळेत आणि त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वेठबिगारीची मुलांना घेऊन गेलेल्या ४ दलालाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यावर बालकामगार अधिनियमान्व्ये आणि अनुसूचित जाती जमाती कायद्यांवये कारवाई करण्यात आल्याची माहिती डॉ गावित यांनी दिली.