अकोला: अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर मातृत्व लादणार्या आरोपीला पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली, तर या आरोपीला सहकार्य करणार्या सहआरोपीला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल बुधवारी देण्यात आला.
प्रकाश सुरेश इंगळे (वय २६ वर्षे) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. आकाश विलास भटकर वय २४ असे सहआरोपीचे नाव आहे. बोरगाव मंजूतील अल्पवयीन मुलगी ३ फेब्रुवारी २०१६ रोजी घरून बेपत्ता झाली होती. मुलीचा शोध लागला नाही म्हणून मुलीच्या वडिलांनी ठाण्यात तक्रार दिली होती की आरोपी प्रकाश याने काही दिवसांपूर्वी तिला पळवून नेण्याची धमकी दिली होती.त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सात महिन्यानंतर आरोपी, अल्पवयीन मुलगी ही निमकर्दा येथे आरोपीच्या नातेवाइकाकडे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली होती.
तपासात आरोपी प्रकाश याने आरोपी आकाशच्या मदतीने मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर? लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्या मुलीने अपत्यास जन्म दिला? होता. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान? सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने? पीडितेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भादंवि कलम ३७६ (२) व पोक्सो कलम ३,४ मध्ये दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, दहा हजार दंड, दंड न भरल्यास २ महिन्यांची साधी कैद, भादंवि कलम ३६३ अपहरण करणे या गुन्ह्यात पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सह आरोपी आकाश विलास भटकर (वय २४ )याने मुख्य आरोपीस गुन्हा करण्यास सहकार्य केल्याबद्दल त्याला सुद्धा भादंवि कलम ३६३, १०९ मध्ये सहा महिन्यांची साधी कैद व दोन हजार दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल किरण खोत यांनी बाजू मांडली.