arrest_1_910
क्राईम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपीला पाच वर्षांची शिक्षा

अकोला: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवून त्याला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला.

शुभम रामा चांदणे असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. १० मे २०२१ रोजी आरोपीने पीडित मुलीला तिच्या घरातून बळजबरीने नेऊन तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

पीएसआय वर्षा राठोड यांनी तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेहोते.सरकार पक्षाने एकुण सात साक्षीदार तपासले तर बचाव पक्षातर्फेतीन साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी शुभम रामा चांदणे याला कलम ३५४ भादंवि व पोक्सो कायदा कलम ७, ८ व ४२ अंतर्गत दोषी ठरवून पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली.

तसेच कलम ५०९ भादंवि व पोक्सोकायदा कलम ११(२). १२ अंतर्गत दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील शीतल भुतडा यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.