अमरावती : अमरावती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वडाळी येथील बांबू गार्डन मध्ये प्रशांत निकम पाटील संकेत राजूरकर आणि ओम भोकरे यांना तपकिरी छातीच्या माशीमार पक्ष्याची महत्त्वपूर्ण नोंद घेण्यात यश आले आहे. याच महिन्यात छायाचित्रित करण्यात आलेल्या या पक्ष्याचे इंग्रजी नाव ब्राउन ब्रेस्टेड फ्लायकॅचर असे असून शास्त्रीय नाव म्युसीकापा मुट्टए आहे.
म्युसिकापीडी कुळातील हा लहानगा माशीमार भारताचा उत्तर पूर्व भाग, चीन आणि थायलंडच्या प्रदेशात प्रजनन करतो. दक्षिण भारत आणि श्रीलंकेत प्रामुख्याने अन्नाच्या शोधात हिवाळी स्थलांतर करून येतो. याची लांबी १२ ते १३ से.मी. असते.
पंखांच्या वरचा भाग हिरवट तपकिरी असून पंखांच्या कडा अधिक गडद असतात. वरच्या पंखांना तपकिरी लालसर झाक दिसून येते. डोळे तुलनेने अधिक टपोरे असून डोळ्यांभोवती पांढऱ्या रंगाचे वलय, आहेत. वरची चोच गडद निळसर आणि खालची चोच फिकट ह्या बाबी याच्या खास ओळखखुणा म्हणता येतील.
अस्पष्ट आवाज असणारा हा पक्षी शक्यतो झाडाच्या वरच्या भागात विचरण करत असला तरी अन्न म्हणून छोटे कीटक आणि अळ्या यांच्या शोधार्थ कमी उंचीची झाडी व झाडांच्या खालच्या भागातही हा पक्षी दिसून येतो.
बांबू गार्डन, वडाळी हे ठिकाण विविध माशीमार आणि वटवट्या पक्ष्यांच्या नोंदीचे महत्वाचे स्थान म्हणून पुढे येत आहे. या परिसरात असलेल्या बांबू आणि इतर खुरटी झाडी तसेच मोठ्या वृक्षाची मुबलकता आणि वर्षभर असणारी पाण्याची मुबलकता यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांच्या अनेक उल्लेखनीय नोंदीची भर पडत आहे.
तपकिरी छातीच्या माशीमार पक्ष्याची ही अमरावती जिल्ह्यातील पहिलीच नोंद ठरली असल्यामुळे पक्षीनिरीक्षक, अभ्यासक आणि वन्यजीवछायाचित्रकार यांनी नोंदकर्त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. बांबू गार्डन परिसराशी संबंधित वनविभागाच्या अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती ज्योती पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती वर्षा हरणे आणि कर्मचारी वर्गाच्या वेळीवेळी सहकार्याच्या भूमिकेबद्दल नोंदकर्त्यानी समाधान व्यक्त केले आहे.