अमरावती

अमरावतीः मनपा अर्थसंकल्पात सहभागसूचना पाठविण्याचे आवाहन

अमरावती, 23 फेब्रुवारी :  अमरावती महापालिकेचा आगामी आर्थिक वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर्षीही प्रशासक तथा आयुक्त हा अर्थसंकल्प सादर करणार असून त्यासाठी अमरावतीकर नागरिकांकडून अभिप्राय मागविण्यात येत आहेत.

शहराच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, रस्ते, नाल्या, विद्युत, सभागृह, उद्यान, वाचनालय यांच्या आवश्यकतेबाबत नागरिकांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत. नागरिकांनी त्यांचे अभिप्राय २८ फेब्रुवारीपर्यंत मनपाच्या संकेतस्थळावर ई-मेलने किंवा महापालिकेच्या जनसंपर्क कार्यालयात नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्त्यासह सादर करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी केले आहे.

गेल्या वर्षी आठ मार्चला सभागृहाची मुदत संपल्यानंतर आयुक्तांची प्रशासकम्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गतवर्षीही आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर केले होते. यंदा अद्याप सभागृह न आल्याने आयुक्तच अंदाजपत्रक सादर करणार आहेत. यापूर्वी अंदाजपत्रकात लोकप्रतिनिधींचे अभिप्राय राहत होते, यंदा नागरिकांना त्यामध्ये स्थान मिळणार आहे.

नागरिकांनी त्यांचे अभिप्राय लेखी स्वरूपात महापालिकेच्या जनसंपर्क कार्यालयात जमा करावेत. ई-मेल द्वारेही अभिप्राय देता येणार आहेत. त्यासाठी amcbudgetsuggestion @gmail.com या संकेतस्थळाचा उपयोग करता येणार आहे.