कोणत्याही अधिवेशनाची सुरूवात ही वादळी असते. विरोधकांकडून दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडणे. गोंधळ, गदारोळ हा प्रत्येक अधिवेशनात नित्याचाच प्रकार असतो. मग विरोधक कोणीही असो ! यंदाच्यावेळी विरोधकांप्रमाणेच सत्ताधारीही सभागृहाचे कामकाज बंद पडण्यासाठी आक्रमक झाल्याचे दिसून आले. राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा हा विरोधक आणि सत्ताधा-यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी गाजला. बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक झाली आहे मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतक-यांच्या डोळयात पाणी आलं आहे. घरगुती गॅस ५० तर व्यावसायिक गॅस ३५० रूपयांनी महागले आहेत. त्यामुळे आता घरगुती गॅसची किंमत अकराशेवर पोहचली आहेत. तर व्यावसायिक सिलिंडर २११९ वर पोहचला आहे. त्यामुळे महागाईचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत याचे पडसाद पुढच्या अधिवेशनात उमटणार आहेच. मात्र अधिवेशनातील गोंधळ, गदारोळाबरोबरच काही किस्से घडले यावर टाकलेली एक नजर…..
राज्यपालांची मराठी शिकवणी
राज्यपालाच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरूवात झाली. २७ फेब्रुवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाच्या दिवशीच राज्यपालांचे अभिभाषण झालं. मात्र राज्यपालांचे संपूर्ण भाषण हिंदीतून झाले, निदान मराठी भाषा दिनाच्या दिवशी तरी राज्यपालांनी दोन वाक्य मराठीतून बोलायला हवे हेाते अशी टीका विरोधकांनी केली. त्यामुळे राज्यपाल हे पहिल्याच दिवशी टीकेचे धनी बनले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दौ़-यावर आल्यानंतर आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून करतात. त्यामुळे आता विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी राज्यपालांनी मराठी शिकण्यासाठी शिकवणी लावली असल्याचीही माहिती मिळत आहे.
मिलींद नार्वेकर आमदार झाले….
अधिवेशनाची सुरूवात राज्यपालांच्या सेंट्रल हॉलमधील अभिभाषणाने झाली. एक एक आमदार, मंत्री सभागृहात जात होते. त्याठिकाणी आमदारांशिवाय कोणालाही बसण्याची परवानगी नसते. पण उध्दव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलींद नार्वेकर हे आमदार नसतानाही विधीमंडळाच्या सभागृहात जाऊन बसले. नार्वेकर हे आदित्य ठाकरेंबरेाबर हॉलमध्ये आले. आणि त्यांच्या मागील रांगेत बसले. एका आमदाराने ही बाब आदित्य ठाकरे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आदित्य यांनी नार्वेकरांना बाहेर जाण्यास सांगितले. आपण आमदार बनावं असं कोणाला वाटत नसेल. यानिमितताने मिलींद नार्वेकरांचेही स्वप्न लपून राहिले नाही. क्षणभर का होईना नार्वेकरांना आमदार झाल्यासारखं वाटल असेल.ठाकरे गटाला खिंडार पाडण्यासाठी शिंदे गटाकडून अनेकांना ऑफर देऊन खेचाखेची सुरू आहे.मिलींद नार्वेकरांना शिंदे गटाची आमदारकिची ऑफर तर नाही ना ?
गिरीशरावांच्या रूपात नवीन काका
महाराष्ट्राच्या राजकारणात काका आणि पुतण्याची जोडी सर्वश्रुत आहे. ठाकरे, पवार, मुंडे, तटकरे अशी अनेक कुटुंबांची नावे घेता येतील. काका-पुतण्यांमधील वादही अनेकवेळा चव्हाटयावर आला आहे. आता मंत्री गिरीश महाजन यांच्या रूपाने नवीन काका महाराष्ट्राला मिळाले आहेत. तसा प्रसंगही अधिवेशनात घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करीत विविध प्रश्नांवरून शिंदे फडणवीस सरकारला खडे बोल सुनावीत होते. त्याचवेळी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी अजित पवारांना मध्येच डिवचण्याचा प्रयत्न केला. महाजनांनी भाषणात अडथळा आणताच अजित पवारांनी गिरीश महाजनांचा उल्लेख “काका ” … “अंकल” .. असा केला. अजित पवार म्हणाले, अंकल, अंकल, काकीला सांगेन आ..मग किती काकी आहेत ते आपल्याला बघावं लागेल. अशी उपरोधिक टोलेबाजी अजितदादांनी केली. गिरीशरावांसह आमदारांना हसू आवरले नाही. महाराष्ट्राला नवीन काका मिळाले.. असा आवाज सभागृहातून आला.
अजितदादा ‘सहशिवसेनाप्रमुख’ …
राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांकडून राजकीय टोलबाजी केली. काचा फुटलेल्या तुटक्या फुटक्या एसटी बसेसवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोची जाहिरात दाखवीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे वाभाडे काढले. त्यानंतर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिटोले हाणले. अजितदादा शिवसेनेची इतकी बाजू मांडायला लागले आहेत की, त्यांना पदच द्यायचं बाकी आहे. त्यावर शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सहशिवसेनाप्रमुख’ … मग मुख्यमंत्री म्हणाले, “पण आता ते ही शक्य नाही. कारण आता शिवसेनाही आपल्याकडे आहे. तीही संधी हुकली तुमची दादा..
जयंतराव विरोधीपक्षनेते …
एकनाथ शिंदेंनी सकाळच्या शपथविधीवरूनही अजितदादांना चांगलेच चिमटे काढले. शिंदे म्हणाले, एकतर जयंतरावांची इच्छा होती. त्या खुर्चीवर तुम्ही बसलात. मग अजितदादा म्हणाले, “जयंतराव बसा माझ्या खुर्चीवर …आणि जयंत पाटीलांसह सर्व आमदारही हसू लागले. निदान दादांनी विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसण्यासाठी सांगितल्याने जयंतराव मनात खुष झाले असतील.
शिंदेंची फडणवीसांना गुगली …
राज्यातील कुटूंब न्यायालयाची संख्या वाढविण्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. राज्यात कुटूंब कलह वाढल्याने न्यायालयाची संख्या वाढवावी लागत असल्याचा मुद्दा फडणवीस यांनी मांडला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी कौटूंबिक वाद होणार नाहीत यासाठी प्रयत्न करणार का ? असा प्रश्न फडणवीसांना केला. शिंदेच्या या गुगलीने फडणवीस क्षणभर थांबले. मग हसत हसत म्हणाले, कुटुंबात वाद होणार नाही, यासाठी तुमच्या घरी तुम्ही आणि माझ्या घरी मी प्रयत्न करू शकणार नाही. मात्र वाद न्यायालयापर्यंत जाणार नाही, यासाठी प्रयत्न करू या, असे उत्तर दिले. फडणवीस यांच्या उत्तराने सभागृह लोटपोट झाले.