अकोला

अज्ञात वाहनांच्या धडकेत मंडळ अधिकारी अनिल बेलाडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

अजय प्रभे मूर्तिजापूर | प्रतिनिधी

मूर्तिजापूर- २४नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर येथून जवळच असलेल्या सोनोरी जवळ कारला अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत येथील पत्रकार अविनाश बेलाडकर याचे लहान बंधू व मंडळ अधिकारी अनिल शंकरराव बेलाडकर (५४) यांचा रुग्णालयात उपचारदम्यान मृत्यू झाला. सदर घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार येथील पत्रकार अविनाश बेलाडकर याचे लहान बंधू व महसूल विभागात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत होते अनिल बेलाडकर हे बुधवारी दुपारी कर्तव्यावर असताना राष्ट्रीय महामार्गाने आपल्या कार क्रमांक एमएच ३० एझेड २३९१ ने मूर्तिजापूरकडे परत येत असताना सोनोरी जवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या धडकेत त्यांच्या छातीत मोठी दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सदर घटनेने शहरात शोककळा पसरली आहे.