पश्चिम महाराष्ट्र

अजित पवार समर्थक संचालकांच्या घरांवर आयकर विभागाची छापमारी!


पुणे, 7 ऑक्टोबर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे  समर्थक आणि निकटवर्तीय साखर कारखान्यांचे संचालक असलेल्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. दौंड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत  सीआरपीएफचे  जवान सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून ही छापेमारी सुरू केली आहे. ज्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची छापेमारी होत आहे ते सर्वजण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाकडून सुरू असलेल्या या कारवाईमुळे थेट अजित पवार यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे.  दौंड शुगर अंबालिका शुगर्स जरंडेश्वर साखर पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार  इन्कम टॅक्स विभागाकडून सुरू असलेली ही छापेमारी पुणे जिल्ह्यातील दौंड परिसर, कर्जत, नंदुरबार परिसरात सुरू आहे. या छापेमारी दरम्यान इन्कम टॅक्स विभागाने सीआरपीएफच्या जवानांची सुद्धा सुरक्षेसाठी मदत घेतली आहे.  साखर कारखान्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. या संदर्भात त्यांनी काही कागदपत्रेही इन्कम टॅक्स आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ६ ऑक्टोबर रोजी किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याला भेट दिली होती. या साखर कारखान्याचा लिलाव चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावेळी किरीट सोमय्या यांनी पुढे म्हटलं, जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण हे कोडं एका सेकंदात अजित पवार सोडवू शकतात. अजित पवार यांना विनंती.. मालक कोण..? अनेक दिवसांपासून संशोधन सुरु आहे. जरंडेश्वरबाबत आतापर्यंत १७ कंपन्या पुढे आल्या आहेत. जरंडेश्वरचे संस्थापक भेटले.. त्यांनी विनंती केल्यामुळे भेट दिली. शरद पवार हे डोकेबाज.. त्यांच्या गोष्टी कशा वेगळ्या असतात. आताही जरंडेश्वर नावानेच नोंदणी केली. आधी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना.. आता जरंडेश्वर शुगर प्रा. लि. याचे मालक पवार कुटुंबालाच माहिती आहे.