अकोला

अकोल्यातील गांधी चौकातील अतिक्रमणाचा सफाया

अतिक्रमण पथकाने हातगाड्या उचलल्या; कर्मचाऱ्यांशी घातली हुज्जत

अकोला: महापालिका प्रशासनाने सुरु केलेल्या धडक अतिक्रमण हटाव मोहिमेत बुधवारी दि. १५ रोजी गांधी चौक, गांधी रोड, जैन मंदिर परिसरातील पुन्हा झालेल्या अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. पथकाने चारचाकी गाड्या जप्त करताना अतिक्रमण धारकांशी चांगलीच हुज्जत घातली.

शहरात हॉकर्स झोन नसल्याने सर्वच प्रमुख मुख्य मार्गावर लघु व्यावसायीक व्यवसाय करतात. महापालिका अस्तित्वात येवून २३ वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही हॉकर्स झोन निर्माण करण्याबाबत प्रशासनाने कोणत्याही उपाय योजना केलेल्या नाहीत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. लघु व्यावसायीक रस्त्यालगत व्यवसाय करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. ही बाब लक्षात घेवून नोव्हेंबर महिन्यापासून महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सातत्याने अतिक्रमण हटाव मोहिम राबवली जात आहे. बुधवारी पथकाने जैन मंदिर परिसर गांधी चौक, चौपाटी आणि गांधी रोडवरील

व्यावसायीकांनी वाहतुकीस अडथळा येईल, असे ठेवलेले साहित्य, फलक आदी जप्त केले तसेच वारंवार सुचना देवूनही वाहतुकीस अडथळा येईल, अशी चारचाकी उभी करणाऱ्या लघु व्यावसायीकांच्या चारचाकी हातगाड्या जप्त केल्या. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे सहा. अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, वैभव कवाडे, से. रफीक, योगेश कंचनपुरे, स्वप्नील शिंदखेडकर, गुलाम मुस्तफा, अब्दुल राजीक, शोभा इंगळे, सविता सगळे, स्वप्नील पवार, धिरज पवार, पवन चव्हाण, सोनु गायकवाड, मनपा विद्युत विभागाचे विजय यादव, महेंद्र रोकडे, हरिहर घोडके, मनोहर मसके, गजानन मँगे, गजानन बोरडे व अभिकर्ता चे अजिंक्य खाडे, नागेश हिरोळे, विशाल खंडारे, हरिश बोंडे, सागर भागवत, प्रशांत झाडे, सुरज लोंढ, नितिन सोनोने आदींनी केली. चारचाकी हातगाडी जप्त करताना लघु व्यावसायीकांनी अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. तसेच हातगाडी जप्त करण्यास विरोध करतानाच चारचाकी गाडी हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे गांधी रोडवरील वाहतुक खोळंबली होती. पथक रस्त्यावर उतरल्या नंतर काही चारचाकी हातगाडी व्यावसायीक आपल्या गाड्या जागेवरुन हटवतात व लांब नेतात. मात्र काही चारचाकी हातगाडीवाले पथक जवळ येण्याची वाट पाहतात. पथक जवळ आल्या नंतर गाडी नेण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारामुळे हातगाड्या एकतर तोडल्या जातात अथवा जप्त केल्या जातात.