क्राईम

अकोला शहरातील आणखी एक गुंड स्थानबद्ध

अकोला प्रतिनिधी४सप्टेंबर:-अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अकोला पोलीस दलाने कंबर कसली असून,अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मोठ्या प्रमाणात एमपीडिए कायद्याखाली तसेच हद्दपारीच्या कारवाया करीत,गुंडांमध्ये दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या शंकर नगर येथील ३०वर्षीय गुंडाला अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारीत केले आहे. सचिन मुकुंद बलखंडे असे स्थानबद्ध केलेल्या गुंडाचे नांव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकर नगर येथील सचिन मुकुंद बलखंडे याच्या विरोधात दंगा करणे,शिवीगाळ करणे,जीवे मारण्याची धमकी देणे, खुनाचा प्रयत्न करणे,गैर कायदेशीर मंडळी गोळा करून घातक शस्त्राचा वापर करणे,हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे,इत्यादी गुन्हे नमूद आरोपी विरोधात दाखल होते,सचिन बलखंडे हा त्याच्यावर केलेल्या प्रतिबंधक कारवाईचे वेळोवेळी उल्लंघन करीत असल्याने, त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तो प्रस्ताव मंजुरी साठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्वतःच्या स्त्रोत द्वारे सचिनवर लावलेल्या आरोपांची खात्री करून, सादर केलेला प्रस्ताव योग्य असल्याची खात्री करून, त्यावर स्वाक्षरी करून, त्याला एक वर्षे स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यावरून सचिन बलखंडेची ४सप्टेंबर रोजी अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. ही कारवाई अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, अकोट फाईल पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केली.