विदर्भ

अकोला मार्गावरील वृक्षतोड सुरुच; जिल्ह्याधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज

स्वप्निल सरकटे
अकोट२०ऑगस्ट -वृक्षारोपणाच्या काळात शालेय विद्यार्थ्यांवर शिक्षकांकडून वृक्षलागवडीचे सुसंस्कार केले जातात.मात्र अकोला मार्गावर या काळात विद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर सातत्याने सुरु असलेल्या वृक्षतोडीमुळे कळत नकळत कूसंस्कार होत आहेत.वृक्षतोडीचे प्रकरण प्रसिध्दी माध्यमांनी उचलून धरल्यावरही ही तोड सुरुच आहे.त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरांमार्फत होण्याची गरज वृक्षप्रेमींकडून बोलतांना व्यक्त होत आहे.
         अकोला मार्गावर गत काही दिवसांपासून रस्त्यालगतच्या मोठ्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल सुरु आहे.या कत्तलीमुळे वृक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून वृक्षतोड न थांबल्यास या प्रकरणाला प्रसंगी आंदोलनाचे रुप मिळू शकते.प्रसिध्दी माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित होऊनही या वृक्षतोडीस परवानगी देणाऱ्या प्रशासनाकडून अद्यापही खुलासा आला नसल्याने यात काहीतरी काळेबेरे असण्याची शंका वृक्षप्रेमींकडून व्यक्त होत आहे.वृक्षतोडीची परवानगी कुठल्या नियम व शर्तीच्या आधारावर देण्यात आली,असा सवालही वृक्षप्रेमी उपस्थीत करत आहेत.तसेच वृक्षतोडीनंतर लाकडी ओंडक्यांची विल्हेवाट कशी व कुठे लावली जात आहे,याची माहितीही वृक्षप्रेमींना हवी आहे.रेल्वेपूलापूढील, अकोला मार्गावर काही शिक्षणसंस्था व त्यांची विद्यालये आहेत.या विद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी वृक्ष लागवडीचे वर्षानूवर्ष धडे घेतात.कोरोना वातावरणामुळे आधिच त्रस्त असलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या विद्यालयांकडे ही वृक्षतोड का सुरु आहे,असा प्रश्न उपस्थित झाल्यास नवल वाटू नये.विद्यालयात जातांना विद्यार्थ्यांना काल पर्यंत तर या ठिकाणी झाडं होती आणि आता कुठे गेलीत,असे अनेक प्रश्न त्यांना पडू लागले आहेत.रक्षाबंधनाला अनेक विद्यार्थी वृक्षांना राखी बांधतात व त्यांच्या संरक्षणाचे अभिवचन देतात.वृक्षतोडीमुळे हे नाते कसे टिकणार,असा सुध्दा प्रश्न आहे.अकोला मार्गावर सातत्याने वृक्षतोड सुरु आहे.या वृक्षतोडीमुळे पक्षांची अनेक घरटी नष्ट झाल्याची चर्चा असून त्यांची किलबिल ऐकायला येत नसल्याने मार्निंग वाँक करणारे नागरिक त्रस्त झाल्याचे सांगण्यात येत आहेत.
जिल्हाधिका-यांकडून संपूर्ण चौकशीची गरज*
अकोला मार्गावरील वृक्षतोडीची संपूर्ण चौकशी होण्याची गरज वृक्षप्रेमींकडून व्यक्त होत आहे.त्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी पुढाकार घेऊन ही वृक्षतोड त्वरीत थांबवून चौकशीचे आदेश द्यावेत,अशी अपेक्षा वृक्षप्रेमींनी व्यक्त केली आहे.किती वृक्षांच्या तोडीची परवानगी दिली,कशासाठी व कोणी दिली.ही परवानगी नियम व शर्ती पाळून देण्यात आली का,वृक्षतोडीसंदर्भात वन व प्रादेशिक वनविभागाशी संपर्क साधण्यात आला होता का,कापण्यात आलेल्या झाडांचे शेड्यूल कसे होते,कोणती झाडे शेड्यूल वन मध्ये होती,वृक्षकटाईपूर्वी त्यांच्या वयाची निश्चिती करण्यात आली होती का,असे अनेक प्रश्न वृक्षप्रेमींनी उपस्थित केले आहेत.
_________________________
*रस्त्यांपेक्षा वृक्षांचे आयुष्य जास्त*
 रस्ते,महामार्गाच्या विकासाच्या नावावर करण्यात येणारी वृक्षतोड असह्य असल्याचे मत वृक्षप्रेमींनी व्यक्त केले आहे.कोणताही रस्ता कितीही दावा केला तरी फारकाळ टिकत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.त्यावर पडणारे खड्डे अनेक अपघातास सुध्दा कारणीभूत ठरतात.त्याउलट वृक्षांचे संगोपन चांगले झाले तर अनेक वृक्ष शंभर वर्षांपर्यंत सावली देतात,असे त्यांचे ठाम मत आहे